स्काईपवर सुनावणी अन् ईमेलवर निकाल, मद्रास हायकोर्टाचा नवा आदर्श
By admin | Published: November 16, 2015 10:03 AM2015-11-16T10:03:21+5:302015-11-16T10:06:21+5:30
दिवाळीनिमित्त सुट्टी असलेल्या मद्रास हायकोर्टाने लग्नाच्या प्रकरणातील सुनावणीसाठी चक्क स्काईपचा वापर केला असून निकालही ईमेलवर दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
मद्रास, दि. १६ - दिवाळीनिमित्त सुट्टी असलेल्या मद्रास हायकोर्टाने लग्नाच्या प्रकरणातील सुनावणीसाठी चक्क स्काईपचा वापर केला असून निकालही ईमेलवर दिला आहे. मद्रास हायकोर्टाच्या या टेक्नोसेव्ही सुनावणीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मद्रासजवळील रामनाथपूरममधील एका चर्चमध्ये लग्नसोहळा पार पडणार होता. मात्र चर्च प्रशासन व लग्न करणा-या तरुणामध्ये वाद झाला होता. हा वाद आयत्यावेळी मद्रास हायकोर्टात पोहोचला होता. चर्चमध्ये लग्न करण्यास परवानगी द्यावी व यासाठी पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्या तरुणाने केली होती. दिवाळीची सुट्टी असल्याने हायकोर्टातील सर्व न्यायाधीश सुट्टीवर होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हायकोर्टाचे प्रशासकीय न्या. व्ही रामसुब्रमण्यम यांनी मदुरई खंडपीठातील न्या. एस वैद्यनाथन यांना स्काईपव्दारे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. यानुसार न्या. वैद्यनाथन यांनी चेन्नईतील निवासस्थानातून स्काईपव्दारे सुनावणी घेतली. कोर्टाने चर्चमध्ये लग्नास परवानगी दिली व लग्नसोहळ्यात पोलिस संरक्षण देण्याचे आदेशही दिले. विशेष बाब म्हणजे या निकालाची प्रत ईमेलव्दारे देण्यात आली. हायकोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्काईपवर सुनावणी झाल्याचे मद्रासमधील कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.