न्यायपालिका स्वतंत्र; घाबरण्याचे कारण नाही
By Admin | Published: December 6, 2015 11:14 PM2015-12-06T23:14:12+5:302015-12-06T23:14:12+5:30
जोपर्यंत न्यायपालिका ‘स्वतंत्र’ आहे आणि देशात कायद्याचे राज्य आहे, तोपर्यंत कसलेही भय बाळगण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही
नवी दिल्ली : जोपर्यंत न्यायपालिका ‘स्वतंत्र’ आहे आणि देशात कायद्याचे राज्य आहे, तोपर्यंत कसलेही भय बाळगण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही, असे भारताचे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी म्हटले आहे. असहिष्णुतेवरील चर्चा ‘राजकीय मुद्दा’ असल्याचेही ठाकूर यांनी नमूद केले.
नवी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक बातचीत करताना न्या. ठाकूर म्हणाले की, ‘असहिष्णुता वगैरे सगळे राजकीय मुद्दे आहेत. आमच्या देशात न्यायाचे राज्य आहे. जोपर्यंत हे न्यायाचे राज्य कायम आहे, जोपर्यंत स्वतंत्र न्यायपालिका आहे आणि जोपर्यंत न्यायालये आपला अधिकार व प्रतिज्ञाबद्धता कायम राखून आहेत तोपर्यंत कोणाला कुणाविषयी घाबरण्याचे वा चिंता करण्याचे काही कारण नाही, असे मला वाटते.’
न्यायाचे राज्य कायम राखणाऱ्या संस्थेचे मी नेतृत्व करीत आहे. प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे संरक्षण केले जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)