CJI Ramana on Judiciary : न्यायपालिकांवर ताण, पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय शक्य - सरन्यायाधीश रमणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 03:26 PM2022-04-15T15:26:06+5:302022-04-15T15:28:17+5:30
CJI Ramana on Indian Judiciary: गेल्या वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालय याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणातील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत आहे. त्याचबरोबर न्यायालयानं अनेकवेळा या परिस्थितीवर नाराजीही व्यक्त केली आहे.
CJI Ramana on Indian Judiciary: भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा (CJI NV Ramana) यांनी शुक्रवारी देशातील न्यायालयांच्या कमी असलेल्या संख्येकडे लक्ष वेधले. पुरेशी न्यायालये असतील तरच न्याय मिळणे शक्य असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी न्यायाधिकरणातील रिक्त पदांवरही चिंता व्यक्त करत न्यायव्यवस्थेवर मोठा भार असल्याचं सांगितलं. "न्यायाधीशांची प्रतिमा खराब करण्याचा सरकारांचा एक नवीन ट्रेंड आहे. आणि तो दुर्देवी आहे," असंही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
रमणा यांनी शुक्रवारी तेलंगण स्टेट ज्युडिशिअल कॉन्फरन्स २०२२ ला संबोधित केलं. "न्यायपालिकेचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिक्त पदांवरील भरती हा चिंतेचा मुख्य विषय आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेशा प्रमाणात न्यायालये उपलब्ध असतील तेव्हाच न्याय मिळण्याची शक्यता असते. आपल्या न्यायपालिकेवर आधीपासूनच ताण आहे," असं रमणा म्हणाले.
यापूर्वीही रमणा यांनी इन्फ्रास्ट्रक्चरबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केलं आहे. तसंच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यानंतरही रिक्त पदे न भरण्यावर केंद्रावर प्रश्न उपस्थित केले होते. "तुमचं मत काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्ही सांगितलेलं की काही नियुक्त्या झाल्या आहेत. यानंतरही काही होत नाही... या गोष्टी अतिशय हलक्यात घेतल्या जात आहे. आम्ही ऐकून आदेश जारी केले तर बरं होईल," असं रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं होतं.