जुलै, आॅगस्टमध्ये मात्र कमी पाऊस
By Admin | Published: June 29, 2015 12:04 AM2015-06-29T00:04:01+5:302015-06-29T00:04:01+5:30
आगामी दोन महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.
नवी दिल्ली : जूनमध्ये बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत सामान्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवतानाच कृषी मंत्रालयाला आकस्मिक योजनेसाठी सज्ज राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे.
जुलै व आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ ते १० टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी म्हटले. जून महिन्यात पेरणीला सुरुवात होते. या महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी पुढील दोन महिन्यांत तशी परिस्थिती राहणार नसल्यामुळे आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जलाशये भरली आहेत.
‘चारधाम’ यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित
डेहराडून : संततधार पावसामुळे रस्ते आणि पूल कोसळल्यानंतर सरकारने चारधाम यात्रा ३० जूनपर्यंत स्थगित केली. हेमकुंडच्या मार्गासह बद्रीनाथ, केदारनाथ व अन्य ठिकाणी किमान दहा हजारांवर यात्रेकरू अडकून पडले आहेत. दरम्यान, तेथे सुरू असलेल्या बचाव कार्यावर यात्रेकरू कमालीचे नाराज आहेत व यात्रेकरूंजवळचे पैसेही संपलेले आहेत. तेथील एटीएममध्येही पैसे भरण्यात येत नसल्याची माहिती आहे.
> पावसामुळे बद्रीनाथ यात्रा व चलोली जिल्ह्यातील हेमकुं ड साहिब यात्रा ठप्प पडली आहे
स्कायमेटचा अंदाज
> स्कायमेट या खासगी हवामानविषयक संस्थेने जुलै महिन्यात सामान्यापेक्षा जास्त (१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य (९९ टक्के), तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस मानला जातो. ९० ते ९६ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी तर १०४ ते ११० टक्के म्हणजे सामान्य तर त्याहीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी ठरते. आयएमडीने यावर्षी ८८ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, विशेषत: वायव्य भारतात मान्सून अपुरा राहील. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा २८ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
> हवामानाचा काळजीपूर्वक अभ्यास करून पिकांची निवड करा. ज्या भागात १०० ते ११० मि.मि. पाऊस पडतो त्या ठिकाणी ६० ते ७० मि.मि. पाऊस झाला असेल, तर धानाऐवजी (भात) मक्याच्या पिकाची निवड करावी, असा सल्ला राठोड यांनी दिला.