जुलै महिन्यात तब्बल ११ लाख रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 12:22 AM2020-08-02T00:22:33+5:302020-08-02T00:22:49+5:30
दररोज सरासरी ३५ हजार नवे रुग्ण
नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये लादलेले निर्बंध जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्यात आले. मात्र त्यामुळे कोरोनाचा संसर्गाचा फैलावही मोठ्या प्रमाणावर झाला आणि जूनच्या कोरोनाच्या जुलै महिन्यात रुग्णसंख्या दुप्पट झाली. गेल्या तीन दिवसांत देशामध्ये दररोज ५० हजारांहून जास्त रुग्ण सापडत असून, जुलैमध्ये देशात ११ लाख रुग्णांची भर पडली आहे. जुलैमध्ये रोज सरासरी ३५ हजार रुग्ण आढळले.
आंध्र प्रदेशमध्ये जुलै महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या नऊ पटीने तर कर्नाटकमध्ये ती सातपटीने वाढली. बिहार, आसाम, केरळ या राज्यांमध्ये जुलैमध्ये कोरोना रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. देशातील प्रत्येक राज्यामध्ये या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या किमान दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक झाली आहे. मात्र याला दिल्ली व गुजरात ही राज्ये अपवाद आहेत. जून अखेरीस देशभरात ८८ लाख कोरोना चाचण्या झाल्या होत्या. जुलै महिन्यात या प्रक्रियेला आणखी वेग आला. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस सुमारे दोन कोटी चाचण्या झाल्या आहेत. जूनमध्ये रोज दोन लाखांहून अधिक, तर जुलैमध्ये रोज पाच लाख किंवा त्याहून अधिक चाचण्या झाल्या. आता दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे.
कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रमध्ये रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात.