जुलै ठरला सर्वाधिक उष्ण; अमेरिका- युरोप होरपळला, कॅनडात वणवे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 06:03 AM2023-07-29T06:03:59+5:302023-07-29T06:05:50+5:30
यंदा जुलै महिन्याची सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंद होणार असल्याचे शास्त्रज्ञांंनी म्हटले. याआधी जुलै २०१९ हा सर्वांत जास्त उष्ण महिना समजला जात असे.
नवी दिल्ली : यंदा जुलै महिन्याची सर्वाधिक उष्ण महिना म्हणून नोंद होणार असल्याचे शास्त्रज्ञांंनी म्हटले. याआधी जुलै २०१९ हा सर्वांत जास्त उष्ण महिना समजला जात असे. कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस तसेच जागतिक हवामानशास्त्र संघटना (डब्ल्यूएमओ) या संघटनांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढला.
हवामान बदलामुळे यंदा जुलैमध्ये सर्वाधिक उष्णतामान असून हरित वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण तातडीने कमी करणे आवश्यक आहे, असे डब्ल्यूएमओचे महासचिव पेटेरी तालास यांनी म्हटले आहे.
यंदा जुलै महिन्यात उत्तर अमेरिका, आशिया, युरोप येथे उष्णतेच्या लाटा आल्या. कॅनडा, ग्रीसमध्ये भयंकर वणवे लागले. यामुळे जगभरात उष्णतामान वाढल्याचे व त्याचे विविध देशांतील लोकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यंदाच्या जुलैच्या २३ तारखेपर्यंत जगातील सरासरी तापमान १६.९५ अंश सेल्सियस होते. जुलै २०१९ मध्ये सरासरी तापमान १६.६३ अंश सेल्सियस नोंदविले होते. (वृत्तसंस्था)
‘ग्लोबल वॉर्मिंग’ नव्हे, ‘ग्लोबल बॉइलिंग’
‘ग्लोबल वॉर्मिंग’चा काळ संपून आता ग्लोबल ‘बॉईलिंग’ सुरू झाले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वाढलेले उष्णतापमान हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले चिन्ह नाही.
- अँटोनिओ गुटेरेस, महासचिव, संयुक्त राष्ट्रे