‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

By admin | Published: June 4, 2016 02:42 AM2016-06-04T02:42:29+5:302016-06-04T02:42:29+5:30

मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

'Jungle Raj' Naveen 'Gunda Raj'! | ‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

Next

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टी आणि भाजपासह संपूर्ण विरोधकांनी समाजवादी पार्टीच्या सरकारवर मनमानीपणाचा आरोप लावून मुख्यमंत्री यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मथुरेतील घटना दुर्दैवी असल्याचे सांगून राज्यातील कायदा व व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचा आरोप केला. जवाहरबाग येथील घटना हे याचे उदाहरण असल्याचे मत त्यांनी टिष्ट्वटरवर
व्यक्त केले. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना परिसरात शांतता प्रस्थापित करून दोषींवर कडक कारवाईची मागणी गांधी यांनी केली. बसपा प्रमुख मायावती यांनी ही घटना सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

धरण्याच्या निमित्ताने कब्जा
अतिक्रमणकर्ते बाबा जयगुरुदेव समूहाचे असण्याची शंका आहे. धरण्याच्या बहाण्याने त्यांनी या जागेवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करा, विद्यमान चलनाच्या जागी आझाद हिंद फौजेचे चलन आणा आदी मागण्या ते करीत होते. याशिवाय एका रुपयात ६० लिटर डिझेल आणि ४० लिटर पेट्रोलची त्यांची मागणी होती. रामवृक्ष यादव, चंदन बोस, गिरीश यादव आणि राकेश गुप्ता हे मुख्य आरोपी आणि समूहाचे म्होरके असून जिवंत असल्यास त्यांना पकडण्यात येईल, असे महासंचालकांनी सांगितले.

भाजपाने विचारले प्रश्न
1. या घटनेत वापरलेली शस्त्रास्त्रे तेथे आली कशी?
2. सूत्रधाराबद्दल संपूर्ण माहिती असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही.
3. राज्यात पोलीसच सुरक्षित नाही मग जनतेचे काय?
4. सपाचे सरकार आल्यापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात तीन पट वाढ झाली आहे. त्याचे काय?

हेमा मालिनी शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त
मथुरेत हिंसाचार झाला असतानाही या क्षेत्रातील भाजपा खासदार हेमा मालिनी या मात्र टिष्ट्वटरवर चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे पक्षाला खजील व्हावे लागले. सोशल मीडियावर टीका होताच त्यांनी लगेच हे फोटो हटवून शहीद अधिकाऱ्यांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. अर्थात भाजपाने मात्र हेमा मालिनींची पाठराखण करताना त्या या घटनेबाबत संवेदनशील असल्याचा दावा केला. यावर राजकारण करू नये, असे मत प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Jungle Raj' Naveen 'Gunda Raj'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.