जनता परिवाराचे होणार लवकरच विलीनीकरण
By admin | Published: March 30, 2015 01:25 AM2015-03-30T01:25:55+5:302015-03-30T01:25:55+5:30
जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणावर या आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने वाद असलेले बहुतांश मुद्दे निकाली काढण्यात आले
नवी दिल्ली : जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणावर या आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने वाद असलेले बहुतांश मुद्दे निकाली काढण्यात आले असल्याचे संयुक्त जदने (जेडी-यू) रविवारी स्पष्ट केले.
मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हा विलीनीकरण होऊ घातलेल्या जनता परिवारातील सर्वांत मोठा गट असल्याने त्यांच्याकडे नव्या एकछत्री पक्षाचे अध्यक्षपद देण्यात येईल. लोकसभेत समाजवादी पक्षाचे ५, राजदचे ४ तसेच जेडी-यू, जेडी(एस) व आयएनएलडी या पक्षाचे प्रत्येकी दोन, असे एकूण १५ खासदार आहेत. राज्यसभेत सपाचे सर्वाधिक १५, त्यापाठोपाठ जेडी-यूचे १२, तर आयएनएलडी, जेडी (एस) व राजदचे प्रत्येकी एक, असे ३० खासदार आहेत.
मुलायमसिंग एक-दोन दिवसांत जेडीएसचे अध्यक्ष, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व आयएनएलडीचे ओमप्रकाश चौटाला यांच्याशी चर्चा करून विलीनीकरणाच्या योजनेला अंतिम स्वरूप देणार असल्याचे जेडीयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी सांगितले. सप, जेडीयू व राजदने यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. येत्या एक- दोन दिवसांत मुलायमसिंग पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सर्व घटक पक्षांची बैठक बोलावतील, त्यामुळे घोषणेची औपचारिकता तेवढी उरली असल्याचे मानले जाते.
नितीशकुमार यांनी गुरुवार व शुक्रवारी दिल्लीत भेटीगाठींचे सत्र पाडले. त्यांनी सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुलायमसिंग यांना तर ते तीन वेळा त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)