जम्मू-काश्मिरात शिक्षणाचा बोजवारा
By admin | Published: November 6, 2016 01:09 AM2016-11-06T01:09:52+5:302016-11-06T01:09:52+5:30
काश्मिरातील बांदिपोरा जिल्ह्यातील सईदनारा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एक शाळा जाळली. त्याबरोबर जाळण्यात आलेल्या शाळांची संख्या आता ३२ झाली आहे.
श्रीनगर : काश्मिरातील बांदिपोरा जिल्ह्यातील सईदनारा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एक शाळा जाळली. त्याबरोबर जाळण्यात आलेल्या शाळांची संख्या आता ३२ झाली आहे. सध्या श्रीनगरमधील दिल्ली पब्लिक स्कूल वगळता एकही शाळा सुरू नाही आणि महाविद्यालयेही बंदच आहेत. सर्व शाळा बंद असतानाच, अतिरेक्यांनी शाळांच्या इमारतींना आग लावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यामुळे पूर्णत: थांबले आहे
श्रीनगरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद शाह अली गिलानी यांचा नातू शिकतो. त्यामुळे त्या शाळेला अतिरेक्यांना हात लावलेला नाही तसेच संचारबंदी व जमावबंदी असली तरी तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही येण्या-जाण्यात अडथळे येत नाहीत. ते सुदैव इतर विद्यार्थ्यांना मात्र नाही.
याखेरीज पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यामुळे जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरील २00 हून अधिक शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. सीमेवरील गावांत व शाळांत तोफगोळे येत आहेत, गोळ्या लागून अनेक जण मृत वा जखमी झाले आहेत. त्यामुळे शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील सईदनारा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीस काल रात्री आग लागली. अग्निशामक दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तथापि, शाळा वाचू शकली नाही. इमारत पूर्णत: जळून खाक झाली. ८ जुलैपासून सुरू असलेल्या काश्मिरातील हिंसाचारात आजपर्यंत ३२ शाळा जाळण्यात आल्या आहेत.
गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेऊन सरकारला शाळांची सुरक्षा करण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारनेही राज्य सरकारला लवकरात लवकर शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. (वृत्तसंस्था)
चकमकीत अतिरेकी ठार
दक्षिण काश्मिरच्या शोपियन भागातील दोबजान गावात उडालेल्या चकमकीत १ अतिरेकी ठार झाला, तसेच एक जवान जखमी झाला. या गावात चार अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी नाकेबंदी मोहिमेत गावाला वेढा दिला. एका घरातून अतिरेक्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक अतिरेकी मारला गेला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, चकमक सुरूच होती.
मुलाच्या मृत्यूनंतर हिंसाचार
श्रीनगर शहरातील इदगाह परिसरात कैसर सोफी (वय १६) नावाच्या एका मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात १२ जण जखमी झाले.
त्यातील सहा जण पेलेट गनमुळे जखमी झाले आहेत. सोफी हा २५ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. सहा दिवसांनंतर शालिमार भागात तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. आज सकाळी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
त्याला सुरक्षा दलांनी जबरदस्तीने विषारी पदार्थ खायला लावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला दफन करण्यात आल्यानंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्यातून संघर्ष उडाला.