भारतात जंक फूड तर विदेशात ज्वारी, बाजरीवर जोर; भारतातून विक्रमी निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:46 PM2023-01-12T12:46:48+5:302023-01-12T12:50:01+5:30
पौष्टिक पदार्थ खाण्यास पसंती
नवी दिल्ली : देशात पिझ्झा बर्गरसारखे जंक फूड खाण्याची सवय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना परदेशात मात्र ज्वारी, बाजरीला मागणी वाढली आहे.
युरोपीय संघातील देश, सौदी अरेबिया तसेच इतर देशांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांची मागणी वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान अनेक देशांनी भारतातून १०१ कोटी रुपयांचे भरड धान्य आणि ४८० कोटी रुपयांचे बाजरी बियाणे आयात केले आहे. कोरोनानंतर पश्चिमी देश आरोग्याबाबत अतिशय सतर्क झाले आहेत. ते जंक फूड खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थ खाण्यास मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
ज्वारी, बाजरी उत्पादनात भारत पहिला
भरड धान्य उत्पादनामध्ये भारत जगात क्रमांक एकवर आहे. संयुक्त राष्ट्राच्या एफएओ संघटनेनुसार, २०२०मध्ये जगात ३.०४ कोटी टन भरड धान्याचे उत्पादन घेण्यात आले होते, यात भारताचे योगदान १.५ कोटी टन म्हणजे तब्बल ४१ टक्के होते. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये देशात १.५९ कोटी टन बाजरी उत्पादित करण्यात आली. भरड धान्याचा सर्वाधिक वापर बिहार आणि आसाममध्ये केला जातो.
पश्चिमी देशांना भरड धान्याची शेती करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे ते भारतातून मोठ्या प्रमाणात भरड धान्य आयात करत आहेत, असे तज्ज्ञांनी म्हटले. विदेशात भरडाची मागणी वाढताना भारतात मात्र जंक फूडच्या प्रेमात तरुणाई बुडालीय. आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल त्यावेळी हळूहळू ज्वारी, बाजरीला तरुण अधिक प्राधान्य देतील, असे मानले जात आहे. २०२३ जागतिक भरड धान्य वर्ष आहे.