बंदमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत, यासिन मलिक, सय्यद गिलानी, मिरवाईज स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:21 AM2018-06-22T04:21:09+5:302018-06-22T04:21:09+5:30
रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले.
श्रीनगर : रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले. या बंदमध्ये निदर्शने करून वातावरण आणखी बिघडवू नये यासाठी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हुरियत कॉन्फरन्सचा अध्यक्ष मिरवाईझ उमर फारूख यालाही स्थानबद्धतेत ठेवले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती सरकार पडल्यानंतर लागू झालेल्या राज्यपाल राजवटीत दहशतवाद्यांबरोबरच फुटीरतावादी नेत्यांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. मिरवाईझ फारूखना निगिन येथील निवासस्थानी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले असून, यासिन मलिकला कोठीबाग पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध केले. हुरियत कॉन्फरन्सच्या गिलानी गटाचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी हे याआधीच स्थानबद्धतेत आहेत.
फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीर खोºयातील जनजीवन विस्कळीत झाले. श्रीनगर येथील बहुसंख्य दुकाने, पेट्रोल पंप तसेच व्यावसायिक आस्थापने बंद होती. तसेच शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता व वाहतुकीवरही परिणाम झाला होता. काश्मीरमधील रेल्वेसेवाही सुरक्षिततेसाठी आजच्या दिवस बंद ठेवली होती. (वृत्तसंस्था)
>पँथर्स पार्टीचे धरणे
मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार पडल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी होणारा घोडेबाजार लक्षात घेता या राज्याची विधानसभा तत्काळ बरखास्त करावी, या मागणीसाठी जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी (जेकेएनपीपी)च्या कार्यकर्त्यांनी जम्मू येथे गुरुवारी धरणे धरले होते. इतर पक्षांचे आमदार फोडून पुन्हा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती पँथर्स पार्टीने व्यक्त केली. याआधी नॅशनल कॉन्फरन्सनेही हीच भीती व्यक्त केली आहे. भाजपाच असे करेल, असे कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले होते.