प्राध्यापकाचे घर फोडणारा विद्यार्थी जेरबंद
By Admin | Published: May 22, 2016 02:11 AM2016-05-22T02:11:57+5:302016-05-22T02:11:57+5:30
सप्तगिरीनगरमधील प्रा.सुरेश आसोले यांच्या घरातून सव्वादोन लाख रोख व सोन्याचे दागिने असा चार लाख ६५ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या ....
सीसीटीव्हीची मदत : साडेचार लाखांचा ऐवज चोरल्याचे प्रकरण
पुसद : सप्तगिरीनगरमधील प्रा.सुरेश आसोले यांच्या घरातून सव्वादोन लाख रोख व सोन्याचे दागिने असा चार लाख ६५ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या ‘त्या’ सुशिक्षित आरोपीस वसंतनगर पोलिसांनी १० तासात जेरबंद केले. न्यायालयाने त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, हा आरोपी येथीलच पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे.
वैभव पठाडे (२१) रा.संभाजीनगर, पुसद असे आरोपीचे नाव आहे. वसंतनगर पोलिसांनी त्याच्याकडून रोख १० हजार व साडेतीन तोळे सोन्याची पोत हस्तगत केली आहे.
येथील सप्तगिरीनगरातील रहिवासी प्रा.सुरेश शामराव आसोले हे १८ मे रोजी बुलडाणा येथे परीक्षक म्हणून गेले होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. घर बंद असल्याचा फायदा घेवून आरोपी वैभव पठाडे याने घराचा कुलूपकोंडा तोडून मुद्देमाल लंपास केला. मात्र प्रा.आसोले यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वैभव कैद झाला. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी वैभव पठाडे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
वैभव हा येथील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून चोरीच्या इतरही घटनांमध्ये त्याच्या सहभागाची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चोरीच्या प्रकरणात विद्यार्थी आरोपी निघाल्याने शहरात नाना तऱ्हेचे तर्क लढविण्यात येत आहे.
अटकेची ही कारवाई वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवराव राठोड, सचिन ढोके, नीलेश शेळके, स्वप्नाली धृतराज, पंकज पातूरकर, भाऊ तळेकर, भाऊ गंधे, मोरे, घुगे, अशोक चव्हाण, जुनेद, तामशेट्टे आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)