4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 10:19 AM2018-05-28T10:19:59+5:302018-05-28T10:43:59+5:30
जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.
मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'जिरो बॅलेन्स-जिरो चार्ज'चं अकाऊंट सुरू करण्यासाठी खूप प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीरो बॅलेन्सचं जन-धन खातं सुरू करावं, यासाठी आपल्या भाषणातूनही लोकांना सांगितलं. पण आता जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, बेसिक सेव्हिग्स बँक अकाऊंट ज्यामध्ये पंतप्रधान जन-धन योजनेचाही सहभाग आहे ते अकाऊंट्स फ्रीज होणं व नंतर सुरळीत होण्याचा धोका आहे.
खरंतर या अकाऊंटला महिन्यातून चार व्यवहार केले जाऊ शकतात. ज्यावर कुठलीही बँक कुठलाही चार्ज आकारू शकत नाही. चार व्यवहारांनंतर बँक चार्ज लावू शकते. पण आता चार व्यवहारा पूर्ण झाल्यावर बँकेकडून ही खाती फ्रीज केली जात आहेत. तर दुसरीकडे, एचडीएफसी, सिटी बँक अशा बँका चार व्यवहारांनंतर ही खाती सामान्य खात्यामध्ये बदलते आहे. जन-धन खातं रेग्युलर झालं तर त्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवला नाही तर अकाऊंट धारकांना पेनल्टी भरायला लागते.
इतकंच नाही, तर बँकांनी फ्री ट्रॅन्झॅक्शनच्या व्याख्येलाही पूर्ण बदललं आहे. यामध्ये फक्त एटीएममधून काढलेले पैसे नाही तर, आरटीजीएस, एनइएफटी, ब्रॅन्च विड्रॉवल, इएमआयचाही सहभाग केला जातो आहे. खातं सुरू केल्यावर जर ग्राहकाने सुरूवातीला चार व्यवहार केले तर नंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीला पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागते आहे.
दरम्यान, ही संपूर्ण माहिती आयआयची मुंबईच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक ऑफ इंडिया त्यांच्याकडील खातं फ्रीज करते आहे. तर एचडीएफसी आणि सिटी बँक ही खाती रेग्युलर खात्यात बदलते आहे. आयसीआयसीआय बँकेने पाचव्या व्यवहारावर चार्ज घ्यायला सुरूवात केली होती पण विरोधानंतर हा चार्ज बंद करण्यात आला.