जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणेच आता शरद यादवही पडणार एकटे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 04:15 PM2017-08-19T16:15:22+5:302017-08-19T17:29:07+5:30
पक्षाने एकटे पाडण्याचा इतिहास जनता दल (संयुक्त)च्या बाबतीत पुन्हा एकदा लिहिला जात आहे. याआधी 2009 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आली होती. विशेष म्हणजे जॉर्ज यांनीही एकेकाळी रालोआचे समन्वयक पद सांभाळले होते.
मुंबई, दि.19- लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी आणि मुलगी मिसा भारती यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणे चर्चेमध्ये येताच बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसला रामराम करत भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या जनता दल युनायटेडच्या नितिशकुमार गटाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश करण्याचाही निर्णय घेतला आहे. एकेकाळी रालोआचे समन्वयक असणाऱ्या शरद यादव या घडामोडींमुळे एकटे पडले आहेत. पक्षाने एकटे पाडण्याचा इतिहास जनता दल (संयुक्त)च्या बाबतीत पुन्हा एकदा लिहिला जात आहे. याआधी 2009 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आली होती. विशेष म्हणजे जॉर्ज यांनीही एकेकाळी रालोआचे समन्वयक पद सांभाळले होते. बिहारमध्येही रालोआचे सरकार तयार झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचे कॉंग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे.
समता पार्टी आणि नंतर जनता दल संयुक्त (जदयु)चे नेते होणारे जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहारच्या राजकारणावर 30 ते 40 वर्षे आपली छाप पाडली होती. मात्र 2009 साली त्यांना मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढण्यास पक्षाने तिकीट नाकारले. पक्षाची धुरा त्यांच्याकडून काढून घेऊन शरद यादव यांच्याकडे देण्यात आली. 1977 पासून मुजफ्फरपूर हा फर्नांडिस यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जाई. 1977, 1980, 1989,1991, 2004 असे पाचवेळा ते या मतदारसंघातून निवडून गेले होते. याच मतदारसंघात त्यांना जय नारायण प्रसाद निषाद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. ज्या नेत्यांची राजकीय कारकिर्द त्यांनी घडवली, त्यांच्याकडूनच राजकारणाच्या पटावरुन दूर होण्याची वेळ फर्नांडिस यांच्यावर आली. आता असेच काहीसे शरद यादव यांच्याबाबतीत घडत आहे.
भाजपाच्या समर्थनामुळे जेडीयूत फूट, शरद यादव व अली अनवर करणार बंडखोरी
24 तासांच्या आत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
चार वर्षानंतर नितीश कुमार यांची भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये 'घरवापसी'
2008 साली जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून रालोआचे समन्वयकपद शरद यादव यांच्याकडे गेले. 2013 साली रालोआमधून बाहेर पडे पर्यंत त्यांच्याकडे हे पद होते. आज जदयु रालोआमध्ये पुन्हा सामिल झाली. परंतु शरद यादव त्यामध्ये नसतील. 2014 साली शरद यादव यांना पप्पू यादव यांच्याकडून मधेपुरामध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. मागील महिन्यामध्ये नितिशकुमार यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद यादव यांनी मात्र आपली भाजपाविरोधी भूमिका कायम ठेवली. शरद यादव यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यसभेतील खासदाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यांच्याकडील राज्यसभेतील गटनेतेपदही काढून घेण्यात आले. ही फूट पडल्यानंतर शरद यादव यांनी बिहारचा दौरा करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचा एकही आमदार वा खासदार त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेला नाही. यावरून शरद यादव यांच्या विजनवासाची सुरुवात झाल्याचे सर्वांना दिसून आले. आता नितिशकुमार यांच्या पक्षातील खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण यावेळी शरद यादव मात्र यांना मात्र बाहेरुन घडामोडी पाहण्याच्या पलिकडे काहीच शक्य होणार नाही असे दिसते.
युवा नेता ते केंद्रीय मंत्री
शरद यादव हे मुळचे मध्य प्रदेशचे. 1 जुलै 1947 रोजी त्यांचा होशंगाबाद जिल्ह्यातील अखमाऊ गावात जन्म झाला. जबलपूरमध्ये शिक्षण झाल्यानंतर ते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून विशेष कार्य केले होते. त्यांना मिसा कायद्याखाली 1969, 1972 आणि 1975 साली पकडण्यातही आले होते. 1974 साली ते जबलपूरमधून लोकसभेत पोटनिवडणुकीतून निवडून गेले. त्यानंतर 1977 साली ते पुन्हा लोकसभेत गेले. 1991,1996,1999,2009 असे सलग चारवेळा ते मधेपुरातून लोकसभेत निवडून गेले. 1998 आणि 2014 साली मधेपुरात त्यांना लालू प्रसाद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध मंत्रीपदांची जबाबदारीही स्वीकारली होती.