न्यायाधीश निवडीतच भ्रष्टाचार, कोर्टाकडून परीक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:18 AM2017-09-16T01:18:18+5:302017-09-16T01:20:36+5:30
हरयाणामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची निवड करण्यासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटण्यास उच्च न्यायालयाचा एक निबंधकच कारणीभूत होता, असे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली आहे.
चंदिगड : हरयाणामध्ये कनिष्ठ न्यायाधीशांची निवड करण्यासाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेचा पेपर फुटण्यास उच्च न्यायालयाचा एक निबंधकच कारणीभूत होता, असे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने ही संपूर्ण परीक्षाच रद्द केली आहे.
परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. समितीने अहवालात असे नमूद केले की, सुनीता आणि सुशीला या दोन परीक्षार्थींना परीक्षेच्या आधीच पेपर मिळाला होता. त्यामुळे हा फुटलेला पेपर इतरांनाही मिळाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच सुनीता व सुशीला यांना निकाल जाहीर झाल्यावर अनु्क्रमे राखीव व सर्वसाधारण प्रवर्गात सर्वाधिक गुण मिळाले होते. न्यायालयाचे परीक्षा विभागाचे निबंधक डॉ. बलविंदर शर्मा यांच्यावर ठपका ठेवत समितीने म्हटले की, हे निबंधक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारांशी वर्षभर संपर्कात होते. त्यापैकी सुनीताशी त्यांचे ७६० वेळा मोबाइलवर बोलणे झाले होते किंवा एसएमएस पाठविले गेले होते.