जरा याद करो कुर्बानी... PM मोदींकडून पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 09:50 AM2024-02-14T09:50:31+5:302024-02-14T09:51:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
नवी दिल्ली - देशभरातील अनेक ठिकाणी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जात होता. मात्र, दुसरीकडे काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले. देशसेवेचं कर्तव्य बजावताना सैन्याच्या जवानांना वीरमरण प्राप्त झालं. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी हा भ्याड हल्ला देशावर झाला, त्यामुळे देश गहीवरला. आज त्या हल्ल्याला ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी.. हे गाणं देशसेवसाठी बलिदान देणाऱ्या जवानांची आठवण करुन देते. पुलवामा हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या बलिदानाची आठवण काढत सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युएई दौऱ्यावर असून तेथील हिंदू मंदिराचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होत आहे. दरम्यान, त्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
"पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची सेवा आणि आपल्या देशासाठीचं त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील.", असे ट्विट मोदींनी केले आहे. मोदींसह इतरही अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली. तर, सोशल मीडियातूनही त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवत शहीदांचे स्मरण केले जात आहे.
PM Narendra Modi tweets, "I pay homage to the brave heroes who were martyred in Pulwama. Their service and sacrifice for our nation will always be remembered."
— ANI (@ANI) February 14, 2024
(File photo) pic.twitter.com/AQhXqsIRlJ
काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले ४० CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकही केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या धाडसी निर्णयाचं भारतीय नागरिकांकडून मोठं समर्थनही करण्यात आलं.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३०० किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला. त्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. म्हणूनच, पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो.
मात्र, या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच, पाकिस्तानलाही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते.