न्या. कर्नन शोधूनही सापडेनात

By admin | Published: May 12, 2017 12:08 AM2017-05-12T00:08:11+5:302017-05-12T00:08:11+5:30

न्यायालयीन बेअदबीबद्दल सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी.एस. कर्णन गेले दोन दिवस

Justice Finding Karnan | न्या. कर्नन शोधूनही सापडेनात

न्या. कर्नन शोधूनही सापडेनात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : न्यायालयीन बेअदबीबद्दल सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी.एस. कर्णन गेले दोन दिवस शोध घेऊनही पोलिसांना सापडले नसले तरी त्यांच्यावतीने गुरुवारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली गेली. मात्र खुद्द न्या. कर्नन कुठे आहेत याविषयी त्यांच्या दोन वकिलांनी परस्परविरोधी माहिती दिली. एकाने न्या. कर्नन भारताबाहेर गेल्याचे सांगितले तर दुसऱ्याने ते चेन्नईतच असल्याची खात्री दिली.
ट्रिपल तलाकच्या विषयावरील सुनावणीसाठी मुद्दाम सुट्टीत बसलेले सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ दिवसभराची सुनावणी संपवून उठण्याच्या बेतात होते तेव्हा अ‍ॅड. मॅथ्यु नेदम्पुरा न्या. कर्नन यांनी केलेली एक याचिका घेऊन आले. न्यायालयाची रजिस्ट्री ही याचिका नोंदवून घेत नाही व कोणीही अ‍ॅडव्होकेट आॅन रेकॉर्ड ती दाखल करायला तयार नाही, म्हणून मी ती याचिका घेऊन तुमच्यासमोर आलो आहे, असे अ‍ॅड. नेदम्पुरा यांनी सांगितले.
न्या. कर्नन यांनी याचिका सादर करण्यासाठी दिलेले वकीलपत्र तुमच्याकडे आहे का, असे सरन्यायाधीशांनी विचारल्यावर अ‍ॅड. नेदम्पुरा यांनी नोटरी केलेले वकीलपत्र त्यांच्यावकडे सुपूर्द केले. त्यावर, ‘ठीक आहे, मी यात लक्ष घालतो’, असे सरन्यायाधीशांनी वकिलास सांगितले. पण न्या. कर्नन आहेत तरी कुठे?, असे न्या. केहर यांनी विचारल्यावर ‘ते चेन्नईमध्येच आहेत’, असे अ‍ॅड. नेदम्पुरा उत्तरले.
अ‍ॅड. नेदम्पुरा यांनी नंतर ते वकीलपत्र पत्रकारांना दाखविले व कालांतराने ते समाजमाध्यमांवर टाकण्यात आले. पण न्या. कर्नन यांनी केलेली ही याचिका नेमकी काय आहे, हे नक्की कळू शकले नाही. एका माहितीनुसार ही याचिका ज्या ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’ कायद्यान्वये न्या. कर्नन यांना शिक्षा झाली त्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी आहे काहींच्या म्हणण्यानुसार सात न्यायाधीशांच्या विशेषपीठाने दिलेला निकाल मागे घेण्यासाठीही ही याचिका आहे.
फेब्रुवारी महिन्यात न्या. कर्नन यांच्याविरुद्धचे ‘कन्टेम्प्ट’ प्रकरण प्रथम सुनावणीस आले तेव्हा हेच अ‍ॅड. नेदुम्पुरा न्या. कर्नन यांच्यावतीने उभे राहण्यासाठी पुढे आले होते. पण त्यांच्याकडे वकीलपत्र नव्हते म्हणून न्यायालयाने त्यांना बोलू दिले नव्हते.
दुसरा वकील, दुसरी माहिती-
1-न्यायालयाबाहेर न्या. कर्नन यांचे वकील म्हणविणाऱ्या अ‍ॅड. डब्ल्यू. पीटर रमेश कुमार यांनी वेगळीच माहिती दिली. न्या. कर्नन नेपाळ किंवा बांगलादेश सीमा ओलांडून एव्हाना भारताबाहेर गेले आहेत व जोपर्यंत राष्ट्रपती भेटीची वेळ देणार नाहीत तोपर्यंत ते पोलिसांना शरण येणार नाहीत, असे अ‍ॅड. कुमार यांचे म्हणणे होते. पण बुधवारी दुपारपर्यंत दक्षिण भारतात कुठेतरी असलेले न्या. कर्नन रस्ता मार्गाने एवढ्या कमी वेळात नेपाळ किंवा बांगलादेश सीमेपर्यंत कसे पोहोचले, याचा खुलासा त्यांनी केला नाही.
2-सर्वोच्च न्यायालयाने अद्याप सविस्तर निकालपत्र दिलेले नाही. ते मिळेपर्यंत न्या. कर्नन त्याविरुद्ध काहीच दाद मागू शकत नाहीत. त्यांना चार-पाच प्रकारच्या याचिका करायच्या आहेत व त्या करण्यासाठी वेळ हवा आहे. शिवाय त्यांना राष्ट्रपतींनी नेमलेले असल्याने आधी ते त्यांच्याकडे कैफियत मांडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींनी भेटीची वेळ देईपर्यंत न्या. कर्नन समोर येणार नाहीत, असे अ‍ॅड. कुमार म्हणाले.
3-हे अ‍ॅड. कुमार न्या. कर्नन यांचे मित्र आहेत व काही वर्षांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयात दुसऱ्या एका न्यायाधीशाच्या न्यायालयात शिरून न्या. कर्नन यांनी तेथील सुनावणीत हस्तक्षेप करण्यावरून गोंधळ घातल्याबद्दल याच अ‍ॅड. कुमार यांना सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा झाली होती.

Web Title: Justice Finding Karnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.