न्या. कर्णन यांना अखेर अटक

By admin | Published: June 20, 2017 09:04 PM2017-06-20T21:04:15+5:302017-06-20T21:04:15+5:30

कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांना कोलकाता पोलिसांनी अखेर मंगळवारी सायंकाळी कोयम्बतूर येथे अटक केली

Justice Karanan finally arrested | न्या. कर्णन यांना अखेर अटक

न्या. कर्णन यांना अखेर अटक

Next

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 20 - सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल शिक्षा ठोठावलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांना कोलकाता पोलिसांनी अखेर मंगळवारी सायंकाळी कोयम्बतूर येथे अटक केली.
दि. 9 मे रोजी शिक्षा शिक्षा ठोठावल्यापासून फरार असलेले न्या. कर्णन कोयम्बतूर येथे कसे व कोणत्या परिस्थितीत सापडले याचा तपशील लगेच स्पष्ट झाला नाही. कोयम्बतूरहून त्यांना चेन्नईत आणण्यात आले. शिक्षा भोगण्यासाठी त्यांना कोलकात्याला नेण्यात येणार होते.

न्या. कर्णन 12 जून रोजी ‘फरार’ अवस्थेत सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्याने पदावरील न्यायाधीशांच्या अटकेने होणारी न्यायव्यवस्थेची नामुष्की टळली. न्या. कर्णन मूळचे चेन्नई उच्च न्यायालयाचे. तेथे त्यांनी अनेक वाद निर्माण केल्याने त्यांची कोलकत्याला बदली केली गेली होती. तेथे बसूनही त्यांनी आपल्या वादग्रस्त उक्ती व कृतीचा सपाटा सुरु ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्यावर ‘कन्टेप्ट आॅफ कोर्ट’चा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.
सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठाने न्या. कर्णन यांना शिक्षा ठोठावताना दोन पानी आदेशात्मक निकाल दिला होता व सविस्तर निकालपत्र नंतर देण्याचे नमूद केले होते. याला पाच आठवडे उलटले तरी हे सविस्तर निकालपत्र अद्याप दिले गेलेले नाही.

दरम्यानच्या काळात शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांपैकी एक न्या. पिनाकी चंद्र घोष 27 मे रोजी निवृत्त झाले. त्यामुळे तयार असलेल्या सविस्तर निकालपत्रावर स्वाक्षरी करून न्या. घोष निवृत्त झाले की अद्याप निकालपत्र तयारच नाही, याचा कोणताही खुलासा सर्वोच्च न्यायालयाने केलेला नाही. निकालपत्र तयार नसेल तर आता निवृत्तीनंतर त्यावर न्या. घोष यांची स्वाक्षरी कशी घेणार ,असाही प्रश्न आहे. त्यांची स्वाक्षरी राहिली असेल तर खंडपीठाची नव्याने रचना करून नव्याने सुनावणी करावी लागेल. थोडक्यात न्या. कर्णन यांच्या निमित्ताने न्यायसंस्थेच्या वाटेस आलेल्या अप्रिय कालखंडाचे कवित्व अद्याप संपल्याचे दिसत नाही.

Web Title: Justice Karanan finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.