न्यायमूर्ती कर्णन यांना वेड लागले
By admin | Published: March 13, 2017 04:26 AM2017-03-13T04:26:36+5:302017-03-13T04:26:36+5:30
कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. एस. कर्णन यांना ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी लिहिलेल्या खुल्या पत्रात ‘वेड लागलेले’ (ल्युनाटिक) म्हटले व या न्यायमुर्तींचे
नवी दिल्ली : कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती सी. एस. कर्णन यांना ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी लिहिलेल्या खुल्या पत्रात ‘वेड लागलेले’ (ल्युनाटिक) म्हटले व या न्यायमुर्तींचे मानसिक संतुलन गमावलेले आहे, असेही सांगितले.
‘‘तुम्ही तुमचे मानसिक संतुलन गमावले आहे हे मला पटलेले आहे,’’ असे जेठमलानी यांनी पत्रात म्हटले. कर्णन यांनी याआधी त्यांच्या (कर्णन) विरोधात अवमान नोटीस जारी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयावर ‘दलितविरोधी’ असल्याचा आरोप केला होता. ‘तुमचे वर्तन हे वेड्यासारखे असून एक दिवस स्वत:ला वाचवण्यासाठी हा वेडेपणाच तुम्हाला ‘बचाव’ म्हणून उपलब्ध असेल अर्थात त्यात यश येण्याची कोणतीही शक्यता नाही’’, असे जेठमलानी यांनी त्यात म्हटले.
कर्णन यांना जेठमलानी यांनी तुमचे दावे काढून घ्या, असे आवाहन केले आणि ‘प्रत्येक मुर्खपणाच्या संभाव्य कृत्याबद्दल क्षमा मागण्याची प्रार्थना करा’ असे म्हटले. तुमच्या वेडेपणाचा अघोरीपणाकिती आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला भेटा. मी तुमच्या डोक्यात काही समज घालीन, असे सांगितले. कर्णन यांनी जातीवरून पक्षपात झाल्याच्या केलेल्या दाव्यांचा प्रतिवाद करताना जेठमलानी म्हणाले,‘‘ भ्रष्टाचाराचे प्राबल्य असलेल्या देशात न्यायपालिका हेच एकमेव संरक्षण आहे.’’ जेठमलानी म्हणाले की, ‘‘मी आयुष्यभर मागासवर्गीयांसाठी काम केले आहे परंतु कर्णन हे मागासवर्गीयांच्या हिताचे मोठे नुकसान करण्याचे काम करीत आहेत.’’ ‘‘मागासवर्गासह देशाच्या सेवेशिवाय अन्य कुठलीही काळजी नसलेल्या वृद्धाच्या जाणत्या सल्ल्याचा विचार करा’’, असे राम जेठमलानी त्यात म्हणाले.
आठ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्णन यांच्याविरोधात अवमानाची नोटीस जारी केली. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील अनेक न्यायमुर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. खंडपीठाने कर्णन यांना आमच्यासमोर १३ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहा, असा आदेश दिला होता. कर्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहून ‘न्यायपालिकेतील उच्च भ्रष्टाचारासंदर्भात’ काही तरी करण्याचे आवाहन केले होते. या पत्रानंतर सर्वोच्च न्यायालयाने कर्णन यांना नोटीस बजावली होती.