Justice L Nageswara Rao: रणजी क्रिकेटर, अभिनेता ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती...; एल नागेश्वर राव निवृत्त झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:49 AM2022-05-21T08:49:06+5:302022-05-21T08:49:39+5:30
एल नागेश्वर राव यांची कारकीर्द एक जबरदस्त वादळासारखी आहे. फार कोणाला माहिती नसेल परंतू नागेश्वर राव यांनी रणजी सामनेदेखील खेळले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव हे शुक्रवारी निवृत्त झाले. जाता जाता त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एका मारेकऱ्याला मुक्त केले. राव यांचे ऐतिहासिक निर्णय काय लक्षात ठेवले जातील, असे निरोप देताना सरन्यायाधीश रमणा यांनी म्हटले.
एल नागेश्वर राव यांची कारकीर्द एक जबरदस्त वादळासारखी आहे. फार कोणाला माहिती नसेल परंतू नागेश्वर राव यांनी रणजी सामनेदेखील खेळले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी ब़ॉलिवूडच्या सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. त्यांच्यासोबत काम केलेल्या वकिलांनी याचे खुलासे केले.
राव हे आंध्र प्रदेशसाठी रणजी ट्रॉफी खेळले होते. त्यांनी काही सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. वकील ते थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनलेल्या राव यांनी सांगितले की, मला सक्रिय राहणे आवडते. खेळाने मला आयुष्यात खूप काही शिकविले आहे. मी तरुण असताना थिएटरमध्ये काम करायचो.
एक न्यायाधीश म्हणून राव यांनी कायद्याची व्याख्या करणे आणि अनेक वेळा संविधानाची व्याख्या करण्यात महत्वाची भूमिका निभावली. कोणावरही लसीकरणासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही, हा त्यांचा निर्णय होता. एवढेच नाही तर राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी एजी पेरारीवलन याला सोडण्याचा निर्णयही त्यांनीच लिहीला, असे रमणा म्हणाले.
न्यायमूर्तींची मुदत वाढली पाहिजे...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ६५ च्या वयात सेवानिवृत्त होऊ नये. हे वय खूप कमी आहे. जोवर जज कामकाजाशी एकरूप होत नाही तोवर तो निवृत्त होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कमीत कमी ७-८ वर्षे काम करण्याची संधी मिळायला हवी, अशी अपेक्ष राव यांनी व्यक्त केली.