न्या. लोया मृत्यू प्रकरण: 'ते' अदृश्य हात राहुल गांधी आणि काँग्रेसचे- संबित पात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:47 PM2018-04-19T12:47:11+5:302018-04-19T12:47:11+5:30
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे.
नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका उपस्थित करणा-या याचिका दाखल करणा-यांच्या मागे राहुल गांधी आणि काँग्रेसचे अदृश्य हात असल्याचा थेट आरोप भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
आपल्या हातातून सत्ता निसटत असताना दिसत असल्याचं पाहिल्यानंच काँग्रेस असं गलिच्छ राजकारण करतं. भाजपाचे यशस्वी अध्यक्ष अमित शाहांच्या विरोधात काँग्रेसनं षडयंत्र रचलं आहे. राजकीय फायद्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांना राजकारण करायचं असल्यास त्यांना मेहनत करावी लागेल. गरिबी पुस्तक वाचून नव्हे, तर त्यांच्यात जाऊन समजते, असा टोलाही संबित पात्रा यांनी राहुल गांधींना लगावला आहे.
गेल्या काही काळापासून लोक ज्या प्रकारे न्याय व्यवस्थेचं राजकीयकरण करत होते, त्यांचा आता पर्दाफाश झाला आहे. राहुल गांधी 100 खासदारांना घेऊन राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते. काँग्रेसनं न्याय व्यवस्थेला रस्त्यावर आणलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, असे ते म्हणाले.