न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:29 AM2018-04-20T02:29:00+5:302018-04-20T02:29:00+5:30
सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले : निकालावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
नवी दिल्ली : गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआय न्यायालयाचे न्या. बी.एच. लोया यांचा नागपूरमध्ये हृदयक्रिया बंद पडून नैसर्गिक मृत्यू झाला, याविषयी संशय घ्यायला जागा नाही, अशी ग्वाही देऊन या मृत्यूचा निष्पक्ष तपास करण्यासाठी आलेल्या चारही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्या.
या प्रकरणात भाजपाध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते. लोया यांच्या मृत्यूनंतर आलेल्या न्यायाधीशांनी त्यांना आरोपमुक्त केले. लोया यांच्या मृत्यूचा शहा यांच्या आरोपमुक्तीशी संबंध नसावा ना, अशी शंका असल्याने याचिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी न भूतो अशी पत्रकार परिषद घेण्याचे कारण या याचिकांची सुनावणी कनिष्ठ न्यायाधीशांकडे लावणे हे होते. त्यामुळे न्यायाधीशांमधील फुटीनंतरचा निकाल म्हणूनही त्याचे औत्सुक्य होते. या वादानंतर सरन्यायाधीशांनी या सर्व याचिका स्वत:च्या खंडपीठाकडे घेतल्या होत्या.
काँग्रेसचे कार्यकर्ते तेहसीन पूनावाला, पत्रकार बंधुराज लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशन व सूर्यकांत ऊर्फ सूरज यांनी लोया मृत्यूच्या तपासासाठी याचिका केल्या होत्या. यापैकी सूरज व लॉयर्स असोसिएशन यांनी मुळात मुंबई उच्च न्यायालयात, तर लोणे व पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केल्या. सुनावणीनंतर राखून ठेवलेला निकाल सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट बंद झाल्याने निकालपत्र मिळायला संध्याकाळ उजाडली.
हे १४४ पानांचे निकालपत्र न्या. चंद्रचूड यांनी लिहिले व त्यांनीच महत्त्वाची निरीक्षणे व निष्कर्ष वाचून दाखविले. मृत्यूच्या वेळी सोबत असलेल्या चार न्यायाधीशांनी पोलिसांना दिलेल्या जबानीविषयी शंका घेण्यास कोणतेही कारण नाही. सादर कागदोपत्री पुराव्यांवरूनही लोया यांना नैसर्गिक मृत्यू आला, हेच स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणी आणखी चौकशी करण्याची कोणतीही गरज वाटत नाही, असे त्यांनी जाहीर केले. याचिका फेटाळण्याची कारणे सांगताना खंडपीठाने याचिकाकर्ते व त्यांच्या वकिलांवर ताशेरे ओढले.
एका न्यायाधीशाच्या मुलीच्या लग्नासाठी नागपुरात असताना न्या. लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला. त्या वेळी सोहराबुद्दीन खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी अमित शहा यांचा अर्ज त्यांच्यापुढे होता. तीन वर्षांनी एका नियतकालिकाने न्या. लोया यांच्या बहिणीशी बोलून मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा वृत्तान्त प्रसिद्ध केला. त्यामुळे राज्य सरकारने पोलिसांकरवी चौकशी केली. त्यात हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष काढला गेला.
काँग्रेस-भाजपात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध
न्यायालयाच्या निकालामुळे प्रश्न सुटण्याऐवजी नवे प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे, तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधी यांनीच हा कट रचला, असा आरोप भाजपाने केला आहे.
संशयाचे निराकरण न्यायालयच करू शकते
न्या. बी.एच. लोया यांच्या गूढ मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशीची मागणी करणाºया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. मृत्यू प्रकरणी तर्कशुद्ध निष्कर्ष निघत नाही, तोपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, असे पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले. लोया यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाचे निराकरण थेट सर्वोच्च न्यायालयच करू शकते, असे त्यांनी म्हटले.
याचिकांमागे राहुल गांधीच - भाजपा
भाजपाने मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांच्या मागे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अदृश्य हात होता आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या चारित्र्यहननासाठी न्यायपालिकेचा त्यांनी वापर केला, असा आरोप केला. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ज्या याचिका दाखल करून लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली गेली, त्या राजकीय स्वार्थासाठी होत्या. या सगळ्यामागे राहुल गांधी व त्यांचा पक्ष होता, अमित शहा आणि भारतीय न्यायपालिका व लोकशाही यांना लक्ष्य केल्याबद्दल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.