न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:02 AM2018-04-19T11:02:16+5:302018-04-19T11:02:16+5:30
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. तसेच न्या. लोया यांच्या चौकशीची मागणी करणा-या याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचं कोणतंही कारण नाही. तसेच या याचिकांमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं, न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू हा नैसर्गिकच आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्रपणे चौकशीची गरज नाही. तसेच या याचिका म्हणजे न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं याचिकाकर्त्यांनाही फटकारलं. काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बी. एस. लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यास नकार दिला आहे.
There is no merit in the petitions & there is no reason to doubt the statements of sitting Judges, attempt of the petitioners was to malign the judiciary, said SC while dismissing petitions seeking SIT porbe into #JudgeLoya's death
— ANI (@ANI) April 19, 2018
#FLASH: SC dismisses petitions seeking Special Investigation Team (SIT) probe into Special CBI Judge BH Loya's death. pic.twitter.com/ta2xEQHZlW
— ANI (@ANI) April 19, 2018
काय आहे प्रकरण ?
नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी रुग्णालयात नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी. आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. गुजरातमध्ये झालेल्या सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्याची सुनावणी करणा-या मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे लोया न्यायाधीश होते.