मराठी माणसाला 'सर्वोच्च' स्थान, 'सरन्यायाधीश'पदी शरद बोबडे विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:48 AM2019-11-18T09:48:48+5:302019-11-18T09:50:27+5:30

न्या. बोबडे मुळचे नागपूरचे असल्याने व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी

Justice Sharad Arvind Bobde sworn-in as the 47th Chief Justice of India. | मराठी माणसाला 'सर्वोच्च' स्थान, 'सरन्यायाधीश'पदी शरद बोबडे विराजमान

मराठी माणसाला 'सर्वोच्च' स्थान, 'सरन्यायाधीश'पदी शरद बोबडे विराजमान

googlenewsNext

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडेंना गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, शरद बोबडेंनी सभागृहात उपस्थित सर्वांना अभिवादन करुन आभार मानले. स्वीकारतील. न्या. बी. पी. गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर न्यायसंस्थेतील या सर्वोच्च पदाचा मान महाराष्ट्राला तिसऱ्यांदा मिळाला आहे. शरद बोबडेंच्यारुपाने मराठमोळा माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या 'सर्वोच्च' स्थानी विराजमान झाला आहे. 

राष्ट्रपती भवनात साध्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. बोबडेंना सत्य आणि गोपनियतेची शपथ दिली. सन 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदाची कारकिर्द सुमारे दीड वर्षाची असेल. वयाची 65 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील. आधीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई सुमारे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची ऐतिहासिक अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची 18 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली होती.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निमित्ताने तब्बल साडेतीन दशकांनंतर मराठी माणूस सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील विधी क्षेत्र राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र मंडळींची उपस्थिती या सोहळ्यात लक्षणीय ठरली. बोबडेंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

न्या. बोबडे मुळचे नागपूरचे असल्याने व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी अनेक वर्षे प्रॅक्टीस केल्याने नागपुरातील बहुतांश मंडळी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश नितीन सांबरे, महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांच्यासह आदी मंडळी दिल्लीत दाखल झाली आहेत. अनेकांना न्या. बोबडे यांनी खासगी निमंत्रण पाठविले आहे. दिल्लीतील मराठी वकिलांमध्ये आनंद : राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या मराठी माणसांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. जवळपास सर्वांसाठीच मराठी सरन्यायाधीशांच्या कार्यकाळात काम करण्याची ही पहिली वेळ असणार आहे. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालये मिळून 200 अधिक मराठी वकील मंडळी दिल्लीत कार्यरत आहेत.

न्यायाधीशांना सूचना
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायाधीशांना शपथविधीसाठी सुट्या घेऊन दिल्लीत येऊ नका, अशा सूचना सरन्यायाधीशांनी दिल्या आहेत. न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने न्या. बोबडे यांनी या सूचना दिल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title: Justice Sharad Arvind Bobde sworn-in as the 47th Chief Justice of India.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.