शिक्षेच्या भीतीपायी न्यायमूर्ती कर्णन परागंदा ?
By admin | Published: May 11, 2017 04:32 PM2017-05-11T16:32:55+5:302017-05-11T16:33:25+5:30
सुप्रीम कोर्टाच्या अवमानाप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्ती सी. एस. कर्णन हे देशातून परागंदा झाल्याची माहिती न्या. कर्णन यांच्या कायदेशीर सल्लागारांनी दिली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - सुप्रीम कोर्टाच्या अवमानाप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायमूर्ती सी. एस. कर्णन हे देशाबाहेर गेल्याची माहिती न्या. कर्णन यांच्या कायदेशीर सल्लागारांनी दिली आहे. कोलकाता पोलिसांच्या पथकाकडून न्या. कर्णन यांचा शोध सुरू असतानाच त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांनी देश सोडल्याचं सांगितलं आहे. न्या. सी. एस. कर्णन यांनी अटक टाळण्यासाठी देश सोडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कर्णन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार होती. त्याआधीच ते देशाबाहेर गेल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूचे पोलीस त्यांचा मागावर असून, त्यांचा शोध घेत आहेत. काल सकाळी ते चेन्नईकडे रवाना झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. चेन्नई पोलिसांच्या मते, कर्णन यांनी बुधवारी सकाळीच सरकारी अतिथीगृह सोडले असून, आंध्र प्रदेशकडे ते रवाना झाले आहेत, असे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून समजते. दरम्यान, न्या. कर्णन हे अटक टाळण्यासाठीच देश सोडून गेले असावेत, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. न्या. कर्णन नेपाळ किंवा बांगलादेशात जातील, अशी शक्यता त्यांचे निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे. मात्र, मार्ग आणि इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयानं न्या. कर्णन यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता चेन्नई येथे जाण्यासाठी त्यांनी कोलकाता येथील आपले निवासस्थान सोडले होते. दुपारी ते चेन्नईला पोहोचल्यानंतर काही वेळातच ते बेपत्ता झाले. सध्या न्या. कर्णन हे कोठे आहेत, याची माहिती नसल्याचे समजते.
(न्या. कर्णन यांना सहा महिन्यांचा कारावास)
न्या. कर्णन यांनी सहकारी न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आणि निराधार करून तसेच सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशांनाही धाब्यावर बसून एकूणच न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेस बट्टा लावला. त्यामुळे त्यांना न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) दोषी ठरवून सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष घटनापीठाने न्या. कर्णन यांना शिक्षा ठोठावली.
कोलकत्याच्या पोलीस आयुक्तांनी न्या. कर्णन यांना तात्काळ अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, असाही आदेश दिला गेला. त्यानुसार सायंकाळी पोलीस न्या. कर्णन यांच्या तेथील शासकीय निवासस्थानी गेलेही. पण सरन्यायाधीशांना शिक्षा ठोठावणारा आदेश सोमवारी दिल्यानंतर न्या. कर्णन चेन्नईला गेले होते आणि तेथे ते 11 मेपर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता कर्णन गायब झाले आहेत.
न्यायालयाने ही अवमानना कारवाई सुरू करून नोटीस काढल्यानंतरही न्या. कर्णन हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढले गेले होते. त्यानंतर ते फक्त एका तारखेला आले आणि नंतर त्यांनी कोलकात्यात बसून सर्वोच्च न्यायालय व त्यांच्या न्यायाधीशांविरुद्ध निरनिराळे आदेश देणे सुरू केले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतेही न्यायिक अथवा प्रशासकीय काम करण्यास मनाई करूनही त्यांनी हा संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला.