न्या. लोया मृत्यूप्रकरणी हायकोर्टातील सर्व खटल्यांची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 03:07 PM2018-01-22T15:07:37+5:302018-01-22T15:07:50+5:30
न्या. लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली- न्या. लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूसंबंधीच्या सर्व दस्तावेजांची चौकशी होणार आहे. या निर्णयानंतर आता न्या. लोया मृत्यू प्रकरणातील दोन याचिका या मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग होणार आहेत. या प्रकरणावर फडणवीस सरकारनंही स्पष्टीकरण दिलं आहे. न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. यात कोणत्याही प्रकारचा कट नाही. न्या. लोया प्रकरणाशी संबंधित सर्व सुनावण्या आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहेत.
न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच!
न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचा खुलासा नागपूर पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी नुकताच केला आहे. नागपूर पोलिसांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. हे स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली, असं त्यांनी स्पष्ट केलं.
'आम्हाला कुणावरही संशय नाही!'
न्यायमूर्तींच्या बंडानंतर विरोधकांनी न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. मात्र त्याचवेळी, न्या. लोया यांचा मुलगा अनुजने पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला कुणावरही संशय नसल्याचं स्पष्ट केलंय. कुठल्याही संशयास्पद परिस्थितीत माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला नाही आणि आम्हाला कोणत्याही चौकशीची गरज वाटत नाही, असं त्यानं म्हटलं होतं.