Justice U U Lalit: अभिमानास्पद! सिंधुदुर्गाचे सुपुत्र होणार भारताचे सरन्यायाधीश; ऑगस्टमध्ये स्वीकारणार पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:24 PM2022-07-28T15:24:27+5:302022-07-28T15:25:18+5:30

Justice U U Lalit: देवगडचे सुपुत्र देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणे अभिमानाची गोष्ट आहे. जाणून घ्या, न्या. उदय उमेश लळीत यांची प्रेरणादायी कारकीर्द...

justice uday umesh lalit to be the next chief justice of india in august 2022 pride to maharashtra of devgad sindhudurg son | Justice U U Lalit: अभिमानास्पद! सिंधुदुर्गाचे सुपुत्र होणार भारताचे सरन्यायाधीश; ऑगस्टमध्ये स्वीकारणार पदभार

Justice U U Lalit: अभिमानास्पद! सिंधुदुर्गाचे सुपुत्र होणार भारताचे सरन्यायाधीश; ऑगस्टमध्ये स्वीकारणार पदभार

googlenewsNext

नवी दिल्ली: भारताचे विद्यमान सरन्यायाधीश (Chief Justice of India) एन. व्ही. रमणा ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सिंधुदुर्गाचे सुपुत्र असलेले न्या. उदय उमेश लळीत (Justice Uday Umesh Lalit) भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून ऑगस्ट महिन्यात शपथबद्ध होऊन पदभार स्वीकारणार आहेत. ही महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले जात आहे. पुढील सरन्यायाधीश लळीत यांच्याबद्दल जाणून घेऊया...

ऑगस्ट महिन्यात सरन्यायाधीश होणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्या. लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंब या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय अन्य गावांमध्ये स्थलांतरीत झाले.

लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत 

लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिलीच करायचे. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक 'एलसीपीएस' डॉक्टर होत्या. त्यामुळे बुद्धिमत्ता, व्यवसाय, चातुर्य आणि अभ्यासवृत्ती रक्तातूनच आलेली. उदय लळीत यांचे वडील उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम ए राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले. तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्ष लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत.

अनेक हाय प्रोफाइल केसमध्ये सहभाग

विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयात हाय प्रोफाईल प्रकरणे चालूनही प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत. ८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2G स्पेक्ट्रम हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. सुमारे १.७० लाख कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये विशेष अधिकार वापरुन ज्येष्ठ वकील उदय लळीत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात केली. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली.

दरम्यान, न्या. उदय लळीत हे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. सन २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या वकिलीचा ठसा उमटवला आहे. देशभरातील बहुतांश उच्च न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद केले आहे. सात वर्ष ते महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात पॅनलवरील ज्येष्ठ वकील होते. आतापर्यंत देशातील सुमारे १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे चालवली आहेत.
 

Web Title: justice uday umesh lalit to be the next chief justice of india in august 2022 pride to maharashtra of devgad sindhudurg son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.