जस्टिन ट्रूडो नरमले? भारताचा उगवता महत्त्वपूर्ण देश असा उल्लेख करत वादाबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:03 AM2023-09-22T11:03:48+5:302023-09-22T11:03:58+5:30
India-Canasa Row: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी कट्टरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कॅनडा भारताला चिथावणी किंवा अडचणीत आणू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी कट्टरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. कॅनडाभारताला चिथावणी किंवा अडचणीत आणू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी भारताला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आणि सत्य समोर आणण्यासाठी कॅनडाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि कॅनडामध्ये उदभवलेल्या राजनैतिक विवादावरील प्रश्नांना उत्तर देताना ट्रुडो यांनी सांगितले की, आम्ही भारत सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि त्यात पारदर्शकता सुनिश्चित करून, उत्तरदायित्व निश्चित करून, न्याय करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, असं आवाहन करतो.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७८ व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या ट्रुडो यांनी सांगितले की, आम्ही कायद्याचं राज्य असलेला देश आहोत. आम्ही कॅनडातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमची मूल्ये आणि आंतरराष्ट्रीय नियमाधारित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं सुरू ठेवू. सध्यातरी आमचं लक्ष त्यावरच आहे. दरम्यान भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा रद्द केल्याच्या कारवाईला प्रतिक्रिया म्हणून कॅनडा सरकारही तशी कारवाई करणार का, असं विचारलं असता ट्रुडो यांनी त्यांचं सरकार भडकवण्याची किंवा कुठलीही समस्या निर्माण करण्याचा विचार करत नसल्याचं सांगितलं.
यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्त्व वाढत असल्याचंही ट्रूडो यांनी मान्य केलं. ते म्हणाले की, भारताचं महत्त्व वाढत आहे यात कुठलीही शंका नाही. तसेच हा एक असा देश आहे ज्याच्यासोबत काम करत राहण्याची आवश्यकता आहे. हे केवळ प्रादेशिक नाही तर जागतिक पातळीवर आहे. त्यामुळे आम्ही चिथावणी देण्याचा किंवा अडचणी निर्माण करण्याचा विचार करत नाही आहोत. आम्ही कायद्याच्या शासनाच्या महत्त्वाबाबत स्पष्ट आहोत. तसेच कॅनडाच्या लोकांच्या सुरक्षेचंही महत्त्व स्पष्ट आहे. त्यामुळेच आम्ही भारत सरकारला आवाहन करतो की, त्यांनी या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी न्याय आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी आमच्यासोबत काम करावं.
१८ जून रोजी खलिस्तानी कट्टरतावादी हरदीप सिंग निज्जर याच्या झालेल्या हत्येमध्ये भारतीय एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला होता. भारताने निज्जर याला २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. दरम्यान, ट्रूडो यांच्या विधानावर भारताने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.