ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 11:39 AM2024-05-15T11:39:26+5:302024-05-15T11:39:45+5:30
तीन महिन्यांपासून आजारी होत्या. तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी त्यांची तब्येत बिघडली.
केंद्रीय मंत्री, भाजपाचे मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आईचे निधन झाले आहे. राजमाता माधवी राजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून राजमाता माधवी यांच्यावर निमोनियाचे उपचार सुरु होते. तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
माधवी राजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. १९६६ मध्ये त्यांचा विवाह माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांच्याशी झाला. माधवी राजे यांचे आजोबा जुद्ध शमशेर बहादुर हे नेपाळचे पंतप्रधान होते. लग्नापूर्वी त्यांचे नाव राजलक्ष्मी होते.