ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून हटवली 'काँग्रेस'ची ओळख, नंतर केला असा 'खुलासा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:00 PM2019-11-25T13:00:29+5:302019-11-25T13:11:04+5:30
माजी काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवरून 'काँग्रेस'ची ओळख हटवल्यानंतर ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.
भोपाळः मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरवरून 'काँग्रेस'ची ओळख हटवल्यानंतर ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यांनी स्वतःला फक्त समाजसेवकच नव्हे, तर क्रिकेटप्रेमी असं म्हटलं आहे. ट्विटवरच्या प्रोफाइलमध्ये अचानक केलेल्या बदलामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. ज्योतिरादित्य काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा रंगली होती. पण त्यांनी या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. मी महिन्याभरापूर्वीच ट्विटरवरची माझी माहिती ओळख बदलली होती. लोकांच्या सल्ल्यानुसार मी माझी माहिती संक्षिप्त केली होती. त्यामुळे माझ्यासंदर्भात ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्या निराधार आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात वाद असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच कमलनाथ यांना पत्र लिहून त्यांनी बऱ्याचदा नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता त्यांनी प्रोफाइल फोटो बदलल्यानं ते चर्चेत आले आहेत. सिंधिया भाजपात जाणार अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती.
Jyotiraditya Scindia to ANI, on no mention of Congress party in his Twitter bio: A month back I had changed my bio on Twitter. On people's advice I had made my bio shorter. Rumours regarding this are baseless. pic.twitter.com/63LAw9SIvb
— ANI (@ANI) November 25, 2019
पण ते वृत्त ज्योतिरादित्य सिंधियांनीही खंडित केलं आहे. ज्योतिरादित्य सिंधियांनी कमलनाथ यांना चार पत्र लिहिली होती. राज्यातील पूरग्रस्तांना भरघोस मदत आणि रस्त्यांच्या डागडुजीचे प्रश्न तातडीनं सोडवण्यास त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु त्यांनी आता कुठेही जाणार नसल्याचं सांगितलं आहे