"मी स्वप्नातही विचार केला नव्हता..."; शिवराज सरकारचे मंत्री ढसाढसा रडले, केला साष्टांग नमस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 01:01 PM2023-11-14T13:01:30+5:302023-11-14T13:02:04+5:30
मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार मंचावर रडत आहेत, तर काही जण नमस्कार करत आहेत.
मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचाराजोरात सुरू आहे. मत मागण्याच्या नवनवीन शैली पाहायला मिळत आहेत. नेत्यांनी हात जोडून मत मागणं सर्रास घडलं आहे, पण मध्य प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार मंचावर रडत आहेत, तर काही जण नमस्कार करत आहेत. शिवपुरी जिल्ह्यातील पोहरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिंधिया समर्थक आमदार आणि शिवराज सरकारमधील पीडब्ल्यूडी राज्यमंत्री, सुरेश राठखेडा मंचावरूनच रडू लागले.
जनतेला मतदान करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, महाराज सिंधिया आणि मामा शिवराज यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला बल्लभ भवनात पाठवतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मंचावरून रडत रडत राठखेडा यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आणि म्हणाले, "मी तुम्हाला विनंती करतो, कृपया माझी लाज राखा." त्यांनी मंचावरूनच लोकांसमोर साष्टांग नमस्कारही घातला.
दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधियाही त्यांच्या समर्थकांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुना ते अशोकनगरपर्यंत निवडणूक रॅली काढल्या आणि त्यांच्या समर्थक नेत्यांसाठी मते मागितली. काही ठिकाणी सिंधिया यांनी भाजपाच्या नावाने नव्हे तर पंतप्रधान मोदींच्या नावाने मतदान करण्याचे आवाहन केले.
गुना जिल्ह्यातील बामोरी मतदारसंघातील उमेदवार महेंद्र सिंह सिसोदिया यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना सिंधिया यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला. सिंधिया म्हणाले की, मी तुम्हाला भावनिक आवाहन करत आहे, माझ्या मनापासून विनंती करतो, माझे हात बळकट करा आणि तुमच्या मुलाला महेंद्रला विजयी करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.