ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जन आशिर्वाद यात्रेत भाजपच्या रंगात रंगवलेला घोडा, प्राणी क्रूरतेचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:58 AM2021-08-20T11:58:22+5:302021-08-20T11:58:42+5:30
Jan Ashirwaad Yatra: पीपल्स फॉर अॅनिमल्सने या प्रकरणी निषेध नोंदवला आहे.
इंदूर: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान इंदूरमधील एका पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांच्या क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी एका घोड्याला भाजपाच्या रंगात रंगवलं होतं. भाजपाचे माजी नगरसेवक रामदास गर्ग यांनीच या घोड्याला बोलावल्याची माहिती आहे. दरम्यान, अनेकांना घोड्याला रंगवलेलं आवडलं नाही आणि त्यांनी भाजपावर प्राण्यांवर क्रुरता केल्याचा आरोपही लावला आहे.
पीपल्स फॉर अॅनिमल्सने या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. पीपल्स फॉर अॅनिमल्सचे स्थानिक प्रतिनिधी म्हणतात की हा प्राण्यांविरोधातील क्रूरता कायदा 1960 चे उल्लंघन आहे. याप्रकरणी पीपल्स फॉर अॅनिमल्सने जन आशीर्वाद यात्रेच्या संयोजकांविरोधात संयोगितागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासह, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली जाईल.
देशभरात भाजपाकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, या यात्रा काही ना काही वादात अडकत आहेत. या यात्रेत अनेक ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. कोविड प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.