ज्योतिर्रादित्य शिंदे पोहोचले दिल्लीत, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 10:39 AM2021-07-07T10:39:59+5:302021-07-07T11:01:35+5:30
मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित जंबो मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन किंवा तीन मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, दुसरीकडे मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांना मंत्रीमंडलात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातच, ज्योतिर्रादित्य शिंदे दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरच शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता, गेहलोत यांना राज्यपाल केल्यामुळे ही चर्चा अधिक बळकट झाली आहे.
भाजपा नेता ज्योतिरादित्य सिंधिया दिल्ली पहुंचे। pic.twitter.com/ldXve1Cd7P
— ANI_HindiNews (@AHindinews) July 6, 2021
ज्योतिर्रादित्य हे मालवा दौऱ्यावर असताना अचानक, मंगळवारी सकाळी त्यांना महाकाल यांचे दर्शन घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले. दिल्लीतून फोन आल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळेच, शिंदे यांचे केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित मानले जात आहे. दरम्यान, गेहलोत राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांची राज्यसभेतील जागाही आता रिक्त झाली असून, भाजपचे राज्यसभेतील नेते म्हणून पीयूष गोयल किंवा प्रकाश जावडेकर यांना संधी निर्माण मिळू शकेल.
विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ७ जागा रिक्त होत्या. तसेच उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून राणेही पोहोचले दिल्लीत
महाराष्ट्राच्या वाट्याला 3 ते 4 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डॉ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते. नारायण राणेंनी दिल्लीत पोहतचाच पत्रकारांनी त्यांना घेरले होते. त्यावेळी बोलताना लवकरच आपल्याला सर्वकाही सांगेन, असे राणेंनी म्हटलं.
या नेत्यांना मिळणार स्थान
मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जोशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह सुशील मोदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घोष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.
मोहन भागवतांनी दिले होते संकेत
सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळात इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंदिया, रिटा बहुगुणा जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना तसेच युतीतील घटक पक्षांना स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच मोदी सरकारमधून काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर किमान ५-६ मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे.