क थुआ बलात्कार खटल्याची सुनावणी ७ मे रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:35 AM2018-04-28T00:35:51+5:302018-04-28T00:35:51+5:30
खटल्याचे स्थानिक न्यायालयात सुुरू असलेले कामकाज निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली, तरी तो दुसरीकडे वर्ग केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले होते.
नवी दिल्ली : कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ७ मे रोजी होणार आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी विनंती आरोपींनी केली आहे, तर पीडितेच्या वडिलांनी हा खटला चंदीगड येथे वर्ग करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. या प्रकरणातील बलात्कारितेचे वडील व अन्य काही जणांनी या याचिका दाखल असून, सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
खटल्याचे स्थानिक न्यायालयात सुुरू असलेले कामकाज निष्पक्षपणे होत नसल्याची जरा जरी शंका आली, तरी तो दुसरीकडे वर्ग केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले होते. आपल्या जिवाला धोका असल्याचे बलात्कारितेचे वडील व कुटुंब, त्यांचे वकील यांनी सांगितले होते, तसेच स्थानिक न्यायालयातच कथुआ खटला चालू द्यावा, तो अन्यत्र वर्ग करू नये आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, अशी याचिका या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींनी केली आहे.