ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:00 PM2024-11-18T14:00:21+5:302024-11-18T14:01:05+5:30
Kailash Gahlot joins BJP : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गेहलोत म्हणाले की, आम आदमी पक्ष सोडणे सोपे नव्हते. हा निर्णय मी एका रात्रीत घेतलेला नाही.
Kailash Gahlot joins BJP : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला राजीनामा दिल्यानंतर कैलाश गेहलोत यांनी आज, सोमवारी ( दि.१८) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. भाजपच्या मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे भाजपचे सदस्यत्व घेतले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गेहलोत म्हणाले की, आम आदमी पक्ष सोडणे सोपे नव्हते. हा निर्णय मी एका रात्रीत घेतलेला नाही.
"मी कोणाच्या तरी दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असे जे नरेटिव्ह करण्यात येत आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. आजपर्यंत मी कधीही कोणाच्या दबावाखाली काम केलेले नाही. २०१५ पासूनच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही कोणाच्या दबावाखाली काहीही केले नाही. त्यामुळे हा गैरसमज आहे", असे कैलास गेहलोत म्हणाले.
#WATCH | Delhi: After joining BJP, Kailash Gahlot says "Some people must be thinking that this decision was taken overnight and under someone's pressure. I want to tell them that I have never done anything under anyone's pressure till date...I am hearing that an attempt is being… pic.twitter.com/ZrRqO3ehJU
— ANI (@ANI) November 18, 2024
याचबरोबर, कैलाश गेहलोत म्हणाले की, ईडी किंवा सीबीआयच्या दबावाखाली मी आम आदमी पक्ष सोडला आहे, असे जे नरेटिव्ह तयार केले जात आहे, ते चुकीचे आहे. मी व्यवसायाने वकील आहे. मी कायद्याची प्रॅक्टिस सोडली आणि आम आदमी पक्षामध्ये सामील झालो, कारण आमचा पक्षातील एका व्यक्तीवर भरोसा होता. तसेच, जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय होते.
कैलाश गेहलोत यांनी काल, रविवारी (दि.१७) आपला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, कैलाश गेहलोत यांच्या भाजपमधील प्रवेशाबाबत आपप्रमुखअरविंद केजरीवाल यांना सवाल करण्यात आला. यावेळी, ही त्यांची (कैलाश गेहलोत) इच्छा आहे, त्यांनी कुठेही जावे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
कैलाश गहलोत यांनी रविवारी आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहून पक्ष सोडण्याच्या कारणांचा पाढा वाचला होता. या पत्रात राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे आप जनतेबद्दलची बांधिलकी विसरल्याचा आरोप कैलाश गहलोत यांनी केला होता. तसेच, शीशमहलचा मुद्दा उपस्थित करत कैलाश गहलोत यांनी अप्रत्यक्षरीत्या अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. आम्ही अजूनही स्वतःला सामान्य लोकांप्रमाणे समजतो का, असा सवाल करत कैलाश गहलोत यांनी तापलेल्या राजकारणाचा उल्लेख करत पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती.