"5 वर्षे कुठे होतात, आता कशाला आलात?"; महिलेने थेट आमदाराच्या कानशिलात लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 10:30 AM2023-07-13T10:30:33+5:302023-07-13T10:38:58+5:30
आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेने जाहीरपणे कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. लोकांनी आमदारालाही धक्काबुक्की केली.
हरियाणाच्या कैथलमध्ये गुहला विधानसभेतील आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेने जाहीरपणे कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. लोकांनी आमदारालाही धक्काबुक्की केली. चीका परिसरातील भाटिया गावातील घग्गर नदीचा बंधारा फुटल्याने गावात पाणीच पाणी झाले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार आले होते. याच दरम्यान आमदाराला थप्पड मारल्याचा व्हिडिओही काही वेळातच व्हायरल झाला. यावेळी ग्रामस्थांनी 5 वर्षांनंतर आता कशाला आलात? अशी विचारणा केली. पूरग्रस्त भागातील जनता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर प्रचंड संतापलेली दिसते.
एक दिवसापूर्वी पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी जिल्हा उपायुक्त जगदीश शर्मा हे आले असता त्यांनी साधूंना शिवीगाळ केली होती. हरियाणाच्या कैथलमधील चीका परिसरात घग्गर नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. 40 गावांना पुराचा धोका असून अनेक गावांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुहलाचे आमदार ईश्वर सिंह भाटिया गावात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले, असता गावकऱ्यांनी विरोध केला.
गर्दीत एका वृद्ध महिलेने आमदार ईश्वर सिंह यांना थप्पड मारली. ईश्वर सिंह यांना आमदार होऊन पाच वर्षे झाली, मात्र ते कधी सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी येथे आले नाहीत, आता कशाला आले आहेत, काय घेण्यासाठी येथे आले आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. काही काळ आमदार ईश्वर सिंह यांना लोकांनी विरोध होता. याठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
आमदार बोलत असताना मध्येच एका वृद्ध महिलेने येऊन आमदाराच्या कानशिलात लगावली. आमदाराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आमदाराला गर्दीतून वाचवलं. याबाबत आमदार ईश्वर सिंह म्हणाले की, परिसरातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत ग्रामस्थांचा संताप स्वाभाविक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.