'काका, माझ्या बहिणीला सोडा'; पाच वर्षांचा भाऊ नराधमाला गयावया करत राहिला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 06:27 PM2018-03-06T18:27:17+5:302018-03-06T18:27:17+5:30
पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खासगी लग्झरी बसच्या क्लीनरने त्या चिमुकलीचं लैंगिक शोषण केलंय.
कोलकाता- पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खासगी लग्झरी बसच्या क्लीनरने त्या चिमुकलीचं लैंगिक शोषण केलंय. चिमुकलीवर तो नराधम क्लीनर बसमध्ये नेऊन बलात्कार करत असताना तिच्या पाच वर्षांच्या भावानं गयावया करत बहिणीला सोडण्याची विनंती केली. परंतु तो नराधम थांबला नाही आणि त्यानं तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या क्लीनरला अटक केली.
कोलकातातल्या कनाल वेस्ट रोडवर एका लग्झरी बसमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, 45 वर्षीय आरोपी बस क्लीनर शेख मुन्नाला अटक केली आहे. तर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अत्याचारामुळे लहानगीच्या शरीरातून जास्त रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे तिची प्रकृती नाजूक आहे. रुग्णालयानं मुलीचे मेडिकल रिपोर्ट दिल्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
झालं असं की, घराबाहेर तीन वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असे बहीणभाऊ खेळत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बसमध्ये क्लीनर बसला होता. तीन वर्षांची ती चिमुकली उभ्या असलेल्या बसजवळ चेंडू आणण्यासाठी गेली होती. त्या संधीचा फायदा घेत क्लीनरनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून बसमध्ये बोलावलं. चिमुकली बसमध्ये येताच त्या क्लीनरनं दरवाजा बंद केला आणि मुलीवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. बाहेर उभा असलेला भाऊ बहिणीला बसमध्ये असहाय्य अवस्थेत पाहून गयावया करू लागला.
बहीण मोठमोठ्यानं ओरडत असल्याचं पाहून पाच वर्षांच्या भावानं दरवाजा जोरजोरात ठोठावला. आरोपीनं दरवाजा न उघडल्यामुळे अखेर तो आईला बोलावून घेऊन आला. त्यानंतर आईनं आरडाओरड करत लोकांना जमवलं. जमलेल्या लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. चिमुकलीची परिस्थिती पाहून डॉक्टरही संभ्रमात पडले. आरोपींना लोकांनी चोप दिला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
चिमुकलीला घेऊन कुटुंबीय आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आहे. मुलीला रुग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. परंतु रात्रभर उपचार केल्यानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्या मुलीला वाचवता येऊ शकतं, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.