कलाम यांना सन्मान दिला, आता आणखी काही नको - कलाम यांचे बंधू
By admin | Published: July 28, 2015 08:57 PM2015-07-28T20:57:31+5:302015-07-28T20:57:31+5:30
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना सरकारने योग्य सन्मान दिला असून आता आम्हाला आणखी काहीही नको अशी भावनिक प्रतिक्रिया कलाम यांचे ज्येष्ठ बंधू मुथू मोहम्मद मीरन मरक्काईर यांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रामेश्वरम, दि. २८ - डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना सरकारने योग्य सन्मान दिला असून आता आम्हाला आणखी काहीही नको अशी भावनिक प्रतिक्रिया कलाम यांचे ज्येष्ठ बंधू मुथू मोहम्मद मीरन मरक्काईर यांनी दिली आहे. कलाम यांच्या निधनामुळे मला आता झोप येईल की नाही माहित नाही, कारण कलाम नेहमीच माझ्या स्मरणी येत राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर रामेश्वरम येथील त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. कलाम यांचे ज्येष्ठ बंधू ९९ वर्षीय मुथू मोहम्मद यांनी मंगळवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुथू मोहम्मद म्हणाले, कलाम यांचे निधन ही माझ्यासाठी मोठी हानी आहे, कलाम यांनी कधीच स्वतःसाठी काहीही मागितले नाही, सरकारने त्यांना योग्य व भरपूर सन्मान दिला असून आम्हाला आणखी काहीही नको असे त्यांनी सांगितले. माझा १०० वा वाढदिवस साजरा करण्याची कलाम यांची इच्छा होती पण त्यांची ही इच्छा अर्धवटच राहिली असे त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले.