कलिखो पुल यांच्या पत्नीने पत्र घेतले मागे
By admin | Published: February 24, 2017 01:38 AM2017-02-24T01:38:04+5:302017-02-24T01:38:04+5:30
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पुल यांनी गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पुल यांनी गेल्या वर्षी ९ आॅगस्ट रोजी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या ६० पानी हिंदी टिप्पणातील आरोपांच्या अनुषंगाने ‘सीबीआय’कडून तपास केला जावा, यासाठी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र पुल यांच्या पत्नी दंगविमसाई यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मागे घेतले.
‘मेरे विचार’ या शीर्षकाने लिहिलेले हे टिप्पण कलिखो पुल यांच्या पंख्याला लटकलेल्या मृतदेहासोबत मिळाले होते. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायाधीशांसह अनेक न्यायाधीशांवर व अनेक काँग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या टिप्पणाच्या अनुषंगाने दंगविमसाई यांनी न्या. जगदीश सिंग केहर यांनी एक पत्र लिहिले होते. हे पत्र दंगविमसाई यांनी दाखल केलेली फौजदारी रिट याचिका आहे, असे मानून त्यावर न्यायालयात खुली सुनावणी घेण्याचे प्रशासकीय निर्देश सरन्यायाधीशांनी दिले होते.
यानुसार दंगविमसाई यांची ही पत्ररूपी याचिका न्या. ए. के गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सकाळी सुनावणीसाठी पुकारली गेली. परंतु दंगविमसाई यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी हे पत्र अशा प्रकारे याचिकेमध्ये परिवर्तित करून त्यावर सुनावणी घेतली जाण्यास आक्षेप घेतला आणि अशा सुनावणीत सहभागी होण्याची इच्छा नाही, असे त्यांनी सांगितले.
दंगविमसाई आत्महत्येच्या तपासाठी उपराष्ट्रपतींकडे दाद मागणार असल्याने सरन्यायाधीशांना लिहिलेले हे पत्र मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अॅड. दवे यांनी केली. तशी परवानगी देत खंडपीठाने दंगविमसाई यांची याचिका मागे घेतल्याने निकाली काढली.
शिवाय न्या. गोयल यांनी पूर्वी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्या. केहर यांच्यासोबत काम केलेले असल्याने ही सुनावणी न्या. गोयल यांच्यासमोर होण्यासही दवे यांनी आक्षेप नोंदविला. दंगविमसाई यांनी गेल्या शनिवारी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन पुल यांनी लिहिलेले हे टिप्पण व त्यांनी स्वत: सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र प्रसिद्ध केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)