कल्पेश याग्निक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 05:11 AM2018-07-14T05:11:07+5:302018-07-14T05:11:21+5:30
दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे (डी.बी. कॉर्प)समूह संपादक आणि लेखक कल्पेश याग्निक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.
इंदूर : दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे (डी.बी. कॉर्प)समूह संपादक आणि लेखक कल्पेश याग्निक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान इंदूरच्या कार्यालयात काम करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुमारे साडेतीन तास उपचार सुरू असताना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. रात्री २ वाजता डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. शुक्रवारी इंदूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ नीरज यांनी मुखाग्नी दिला.
कल्पेश यांचा जन्म २१ जून १९६३ रोजी झाला होता. १९८८ मध्ये ते दैनिक भास्कर समूहाशी जोडले गेले. ५५ वर्षीय याग्निक रोखठोक वक्ते आणि देशातील प्रसिद्ध पत्रकार होते. समाजातील संवेदनशील मुद्यांवर निर्भीड आणि निष्पक्ष लेखणीबद्दल ते ओळखले जात. दर शनिवारी दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध होणारा त्यांचा ‘असंभव के विरुद्ध’ हा स्तंभ बहुचर्चित होता. त्यांच्यामागे आई प्रतिभा, पत्नी भारती, शेरना, शौर्या या दोन मुली, भाऊ नीरज आणि अनुराग हे आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याग्निक यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सामाजिक विषयांवरील त्यांचे लेखन अंतर्मुख करायचे. त्यांची लेखणी सरकारला आरसा दाखविणारी होती.