कलराज, नजमा कायम
By admin | Published: July 2, 2016 04:03 AM2016-07-02T04:03:24+5:302016-07-02T04:03:24+5:30
अल्पसंख्याक कल्याणमंत्री कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्याची शक्यता मावळल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबत फेरबदल करताना अल्पसंख्याक कल्याणमंत्री कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्याची शक्यता मावळल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
मे २०१४ मध्येमोदी यांनी मंत्र्यांसाठी वयाची मर्यादा ७५ वर्षे निश्चित केली होती. मिश्रा आणि हेपतुल्ला हे पंच्याहत्तरित असले तरी त्यांना वगळले जाणार नाही. हेपतुल्ला यांनी मागच्या वर्षी एप्रिलमध्येच ७५ व्या वर्षात पर्दापण केले असून, कलराज मिश्रा यांचा आजच (शुक्रवारी) ७५ वा वाढदिवस आहे.
जूनच्या मध्यात मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत मिश्रा यांची प्रशंसा केली होती. कलराजजी यांनी मंत्रालयात एवढे चांगले काम करून वयाची आडकाठी येत नसल्याचे सिद्ध केले, अशा शब्दांत मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ब्राह्मण आणि दलित समाजाला आकर्षित करण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे कलराज यांचे मंत्रिपद कायम राहील, असे दिसते.
वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यापासून प्रसारमाध्यमे नजमा हेपतुल्ला यांच्या कारकीर्दीवर लिहीत आहेत. जेव्हा-जेव्हा त्या मोदी यांना भेटत त्या-त्यावेळी त्यांच्या निवृत्तीसंदर्भात हसण्यावारी बोलले जायचे. अमेरिकेच्या खाजगी दौऱ्यावर जाण्यासाठी परवानगी घेण्यासाठी त्या पंतप्रधान मोदी यांना अलीकडेच भेटल्या होत्या. त्या काही बोलण्याआधीच मोदी त्यांना म्हणाले की, तुमच्या तीन मुली आणि नातवंडांना भेटण्यासाठी तुम्ही सुटी घ्यायला हवी. मंत्र्यांच्या विदेश दौऱ्याबाबत मोदींची भूमिका कठोर असते. तथापि, कौटुुंबिक स्थितीमुळे नजमा यांचा अपवाद आहे.
सूत्रांनुसार ७५ वर्षे वयाची मर्यादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाखातर फक्त लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी घालण्यात आली होती. तथापि, मोदी अडवाणींच्या विरोधात नाहीत. मोदी यांच्या मते मिश्रा आणि नजमा राजकीयदृष्ट्या उपयुक्त असल्याने त्यांचे मंत्रिपद शाबूत राहील.
भाजपमध्ये नजमा सर्वांत ज्येष्ठ मुस्लिम नेत्या आहेत. मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती दिली जाण्याची आणि अल्पसंख्याक समुदायातील आधार भक्कम करण्यासाठी एम.जे. अकबर यांंचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
>रविवारी बैठक; विधानसभा निवडणुकांवर डोळा
दुसरीकडे, विजय सांपला हे दलित समाजाचे असल्याने बसपाच्या मतपेढीला सुरुंग लावण्यासाठी त्यांच्यावर पंजाब प्रदेश भाजपची सूत्रे दिली जातील, तसेच दलित नेते प्रदीप तामता यांना अलीकडेच राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे. उत्तराखंडातील दलित मतपेढी (वोट बँक) भक्कम करण्यासाठी त्यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातील दलित समाजाच्या नेत्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याचा भाजप नेतृत्वाचा विचार आहे. केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचे १३ मंत्री आहेत; परंतु दलित एकही नाही. दलित समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपला असे करणे आवश्यक आहे. हे तत्त्व महाराष्ट्रासाठी लागू केल्यास रिपाइं नेते रामदास आठवले यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.नवीन चेहरे :राजवीर सिंह, राघव लखनपाल, अनुप्रिया पटेल, रामेन देका, राजेश सिंह, कर्नल सोनाराम जाट आणि उत्तर प्रदेशातील बहराईच मतदारसंघातील खासदार साध्वी सावित्रीबाई फुले