चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:00 IST2025-04-11T17:55:43+5:302025-04-11T18:00:22+5:30
गितांजली एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण
गितांजली एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांनी मारहाण करून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हावडा ते कल्याण प्रवासादरम्यान बडनेराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि कँटीन चालकांची मुजोरी उघड झाली आहे.+
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील रहिवासी सत्यजीत बर्मन हे ५ एप्रिल रोजी हावडा- मुंबई गितांजली एक्स्प्रेसने प्रवासल करत होते. बडनेरा रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रवाशी आणि कँटीन कर्मचारी यांच्यात नियमानुसार ठरलेल्या वजनात पदार्थ देत नसल्याच्या कारणावरुन वाद सुरू होता. त्यावेळी बर्मन यांनी तिथे उपस्थित असलेल्या एका कँटीन कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. कर्मचाऱ्याने त्यांना कँटीनच्या डब्यात जाणून खात्री करण्यास सांगितले. पंरतु, बर्मन हे त्या डब्यात गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली. नंतर हा वाद आणखीच वाढला आणि कर्मचाऱ्यांनी बर्मन यांना मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी मला डब्ब्यातच डांबून ठेवले, असाही बर्मन यांनी आरोप केला आहे.
हा प्रकारानंतर बर्मन यांनी कल्याणपर्यंतचा त्यांचा प्रवास पूर्ण केला. कल्याण स्थानकात पोहोचताच त्यांनी लोहमार्ग पोलिसांना त्यांच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गितांजली एक्स्प्रेसमध्ये कँटीन चालवणाऱ्या कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बर्मन यांनी केली.