कमला मिल आग प्रकरण : युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:18 AM2018-05-02T01:18:52+5:302018-05-02T01:18:52+5:30
कमला मिल आग प्रकरणी मोजोस ब्रिस्टोचा सहमालक युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला
नवी दिल्ली : कमला मिल आग प्रकरणी मोजोस ब्रिस्टोचा सहमालक युग तुलीला अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.
मुंबई उच्च न्यायालय अपिलावर निर्णय घेत नाही, तोपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती तुलीने सर्वोच्च न्यायालयाला याचिकेद्वारे केली होती. त्यावर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला. गेल्याच आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने तुलीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या याचिकेत काही अर्थ राहिला नाही, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
तुलीतर्फे ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. या केसमधील अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची बाब त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली.
उच्च न्यायालयात अपिलावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत तरी तुलीला अंतरिम दिलासा द्यावा, अशी विनंती रोहतगी यांनी केली. मात्र, न्या.ए. के. सिक्री व अशोक भूषण यांनी तुली याचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला.