"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 03:31 PM2024-06-17T15:31:50+5:302024-06-17T15:44:30+5:30

अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान, एका रेल्वे प्रवाशाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

kanchenjunga express train accident passenger told what scene was like at the time of accident | "लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या धडकेमुळे तीन बोगींचं मोठं नुकसान झालं. अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान, एका रेल्वे प्रवाशाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

एका प्रवाशाने अपघाताबाबत सांगितलं की, "ट्रेन मागून जोरात धडकली तेव्हा मी झोपलो होतो. या धडकेमुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर मी ताबडतोब माझ्या कुटुंबाकडे गेलो, जिथे माझं कुटुंब बसलं होतं. मी बाहेर पाहिलं तेव्हा मला कळलं की, काही लोकांचा मृत्यू झाला आहे. दुखापतीमुळे मला फारसं समजू शकलं नाही. प्रत्येक कोपऱ्यातून लोक मदतीसाठी ओरडत होते. हा एक भयंकर क्षण होता."

अधिकाऱ्यांनी कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेवर माहिती दिली. "या घटनेत २५ लोक जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आम्ही लवकरात लवकर बचाव कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला पाठीमागून धडक दिली आहे, हे नेमकं कसं झालं हे तपासानंतरच कळेल" असं म्हटलं आहे. 

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, आज सकाळी हा अपघात घडला आहे, आगरतळाहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिग्नल तोडणाऱ्या मालगाडीने मागून धडक दिली. ट्रेनचा मागील गार्ड डब्बा, दोन पार्सल व्हॅन आणि जनरल कंपार्टमेंटचं नुकसान झालं आहे. बचावकार्य सुरू आहे. रेल्वेचे एडीआरएम, जिल्हा आणि राज्य प्रशासन, एनडीआरएफ, लष्कर बचाव कार्यासाठी तेथे पोहोचले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: kanchenjunga express train accident passenger told what scene was like at the time of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.