तीन दिवसांत कोंडी फोडा, अन्यथा...
By admin | Published: November 18, 2016 01:36 AM2016-11-18T01:36:14+5:302016-11-18T01:36:14+5:30
तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला
नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे पैशांसाठी देशभर गोंधळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर गुरुवारी घणाघाती हल्ला केला. तीन दिवसांत पैशांच्या टंचाईची समस्या सोडवा किंवा नोटाबंदी मागे घ्या; अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्रीद्वयांनी सरकारला दिला.
दोन्ही नेत्यांनी आझादपूर मंडी भागातील जाहीर सभेत मोदी सरकावर हल्ला चढविला. सरकारच्या या निर्णयामुळे देशाची आणीबाणीहूनही अधिक वाईट अवस्था झाली आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. शेतकरी संकटात सापडले असून, मजुरांची उपासमार सुरू आहे. लोकांना स्वत:चे पैसे मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत धक्के खावे लागत असून, त्याची तक्रार करणाऱ्यांना ‘गद्दार’ ठरविले जात आहे, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.
मोदींना उद्योगपतींचे पाठीराखे संबोधत केजरीवाल यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ‘नोटाबंदीच्या नावाखाली आणि देशभक्तीच्या आडूून ८ लाख कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले. अंबानी, अदानी आणि विजय मल्ल्या यासारख्या अब्जाधीशांना बँकांनी ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. ही सगळी रक्कम या अब्जाधीशांनी गिळंकृत केली असून, त्यामुळे बँका कंगाल होण्याच्या मार्गावर आहेत. मोदी सरकारने या कर्जाचा नवा आणाही वसूल केलेला नाही. उलट अब्जाधीशांचे १ लाख १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. आता त्याची भरपाई करण्यासाठी नोटाबंदीची टूम काढली आहे. लोकांनी आपले पैसे बँकेत जमा करावेत यासाठी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. यामुळे बँकांत दहा लाख कोटी रुपये जमा होतील, असा सरकारचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
...तर आंदोलन
नोटाबंदीला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई संबोधून त्याच्या आडूून उद्योगपतींची कर्जे माफ करण्यात येत असून, कोट्यवधींचा घोटाळा सुरू आहे. हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही. सरकारने तीन दिवसांत लोकांचा त्रास दूर करावा किंवा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा संपूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
व तृणमूलच्याच्या सर्वेसर्वा ममता बॅनजी यांनी दिला.
आम्ही जनतेच्या लढाईसाठी...
आम्ही सामान्य नागरिकांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्हाला तुरुंगात टाका किंवा गोळ्या घाला. आम्ही माघार घेणार नाही. संघर्ष सुरूच ठेवू. एक व्यक्ती प्रामाणिक बाकी सगळे चोर. एक संत आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. -ममता बॅनर्जी
या पैशांतून मोदीजी आपल्या उद्योगपती मित्रांचे उर्वरित ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतील. हे सर्व सामान्य जनतेची छळवणूक करून केले जात आहे.
- केजरीवाल