कंगनाकडून इंदिरा गांधींची स्तुती; शेतकऱ्यांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:00 AM2021-11-22T07:00:23+5:302021-11-22T07:01:55+5:30
कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी अतिरेकी असा केला होता. त्यानंतर यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन आणि कायदा विभागाचे समन्वयक अंबुज दीक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगना रनौतने आपली नाराजी यापूर्वीच जाहीर केली आहे. मात्र, आता कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची स्तुती करताना शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे.
कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी अतिरेकी असा केला होता. त्यानंतर यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अमरीश रंजन आणि कायदा विभागाचे समन्वयक अंबुज दीक्षित यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. कंगनाच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देताना अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, कंगनाला तुरुंगात पाठविण्याची गरज आहे.
सोशल मीडियावर काय केली पोस्ट?
कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, खलिस्तानी अतिरेकी आज सरकारला अडवत आहेत; पण भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विसरू नका. त्यांनी या अतिरेक्यांना आपल्या पायाखाली चिरडले होते. त्यांनी या देशासाठी खूप काही सहन केले आहे. या लोकांना डासांसारखे चिरडले; पण, देशाचे तुकडे होऊ दिले नाही. कित्येक दशकांनंतर हे लोक आजही त्यांच्या नावाने थरथर कापतात.