संतापजनक! कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 08:49 AM2020-09-11T08:49:33+5:302020-09-11T08:55:26+5:30
मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद उत्तर भारतातही उमटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये या वादावरून लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे.
वाराणसी (उत्तर प्रदेश) - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादाने आता पूर्णपणे राजकीय वळण घेतले आहे. मुंबई महानगरपालिकेने कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यानंतर संतापलेल्या कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जहरी भाषेत टीका केली होती. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या या वादाचे पडसाद उत्तर भारतातही उमटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये या वादावरून लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे.
वारामसीमध्ये चौकाचौकात लागलेल्या पोस्टर्समधून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाची तुलना महाभारतामधील द्रौपदी वस्त्रहरणाशी करण्यात आली आहे. यामध्ये कंगनाला द्रौपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दु:शासनाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीकृष्णाच्या रूपात दिसत आहेत.
वाराणसीमधील वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. याबाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने कंगनाचे कार्यालय पाडण्याची केलेली कारवाई हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. दरम्यान, या संपूर्ण वादामध्ये कंगनाविरोधात आक्रमक राहिलेल्या शिवसेनेला कौरवसेनेच्या रूपात दाखवण्यात आले असून, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची तुलना धृतराष्ट्राशी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख कंगनाला भारी पडणार; विक्रोळीत तक्रार दाखल
कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणं महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली.
कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन
अभिनेत्री कंगना रनौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही. तर दुसरीकडे, कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात समर्थन केले. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी