जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:55 PM2020-09-09T16:55:03+5:302020-09-09T17:28:44+5:30

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

kangana ranaut pok mumbai bmc demolition mehbooba mufti tweet jammu kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

Next

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने केलेल्या वक्तव्यावरून बुधवारी सकाळपासूनच मुंबईत राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. कंगना मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. 

आज सकाळी कंगना राणौतच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर कंगनाने एक ट्विट करत म्हटले आहे की, 'मुंबई हा पाक व्याप्त काश्मीर (पीओके) बनत आहे, हे माझे म्हणणे सिद्ध होत आहे.' तसेच, 'डेथ ऑफ डेमोक्रसी' अशा तीन शब्दांत कंगना राणौतने तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे.

दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर केल्यावरून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कंगना आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "लोकशाही आणि कायद्याच्या हत्येचे उदाहरण म्हणून पीओके का वापरायचे? अराजकता आणि राज्य पुरस्कृत दडपशाहीनं अडचणीत सापडलेली जम्मू काश्मीरातील घर पाहा. याठिकाणी आधीच लोकशाहीची हत्या झाली आहे", असे ट्विट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

कार्यालयावर कारवाई सुरू होताच कंगनाचा हल्लाबोल
आज सकाळी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई सुरू करताच कंगनाने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कंगनाने एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचे नाव अयोध्या होते. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडले जाते आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारले जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले. 


 

पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती
कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती. 

शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना आदेश
कंगना थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरून पक्ष प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. 'कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर कोणतंही विधानं करू नका,' अशा सूचना मातोश्रीवरून देण्यात आल्या आहेत. 

कंगनाच्या कार्यालयात नेमकं काय अनधिकृत?
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन,  स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी  वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.

महापालिकेने बजावली होती नोटीस 
कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती.  कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.

ना डरुंगी...ना झुकूंगी
राणी लक्ष्मीबाईचं धाडस, शौर्य आणि बलिदान मी सिनेमाच्या माध्यमातून जगले आहे. हे लोक मला माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखत आहेत याचं दु:ख आहे. मी राणी लक्ष्मीबाईच्या मार्गावर चालत आहे. मी कोणालाही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात सतत आवाज उचलत राहणार आहे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी असंही कंगनानं ट्विटमधून शिवसेनेचं नाव न घेता बजावलं आहे.

कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होते

आणखी बातम्या...

- महाविकास आघाडीला मराठा समाज माफ करणार नाही, विनायक मेटेंची टीका

- "जलयुक्त शिवारमध्ये १० हजार कोटी रुपये बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा"    

- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती    

- मोदी सरकार IRCTC मधील हिस्सा विकण्याच्या तयारीत, दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला    

 

Web Title: kangana ranaut pok mumbai bmc demolition mehbooba mufti tweet jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.