'ती' गोष्ट सिद्ध करा, पद्मश्री पुरस्कार परत करेन; कंगना रणौतचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 05:55 AM2021-11-14T05:55:52+5:302021-11-14T05:56:34+5:30
स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.
नवी दिल्ली : १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी कोणते युद्ध झाले होते, असा सवाल अभिनेत्री कंगना रणौत हिने आपल्या टीकाकारांना विचारला आहे. स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचा मी अपमान केला असे सिद्ध केल्यास पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारला परत करेन, असेही आव्हान तिने दिले आहे.
१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे अत्यंत वादग्रस्त उद्गार कंगना रणौतने नुकतेच काढले होते. त्यामुळे सर्वच स्तरांतून तिचा तीव्र निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कंगनाने म्हटले आहे की, महात्मा गांधी यांनी भगतसिंग यांना वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तसेच सुभाषचंद्र बोस यांनादेखील कधीही पाठिंबा दिला नाही.
एका पुस्तकातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांची अवतरणे उद्धृत करून कंगना रणौत हिने सांगितले की, स्वातंत्र्यसंग्रामात झाशीची राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस, स्वा. सावरकर यांनी मोठे योगदान दिले याची मला माहिती आहे. १८५७ सालच्या स्वातंत्र्यसमरात सर्वजण एकजुटीने लढले होते. मात्र १९४७ साली एखादे युद्ध झाले होते का, याबाबत मात्र मी अनभिज्ञ आहे.