कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:14 AM2024-07-04T09:14:38+5:302024-07-04T09:18:04+5:30
कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्या बदलीशी संबंधित बातम्यांवर त्यांचा भाऊ शेर सिंग महिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडीतील भाजपा खासदार कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्या बदलीशी संबंधित बातम्यांवर त्यांचा भाऊ शेर सिंग महिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितलं की, त्यांची बहीण कुलविंदर कौर यांच्या पतीची बंगळुरूला बदली झाली आहे. तेही सीआयएसएफमध्ये आहेत. पूर्वी त्यांची मुलं माझ्यासोबत राहायची, आता ती कुलविंदर कौरसोबत आहेत.
बंगळुरूमध्ये एक क्वार्टर मिळालं असून कुलविंदर कौर तिथे राहत आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. चौकशीनंतर जो निर्णय येईल, तो तुम्हाला कळवला जाईल. बहीण कुलविंदर कौर आणि कुटुंब सुखरूप आहे. शेर सिंग महिवाल यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कुलविंदर कौर अजिबात माफी मागणार नाही. त्यांच्याकडे माफी नावाचा कोणताही शब्द नाही. जर कंगना राणौतने तिच्या वक्तव्याबद्दल अद्याप माफी मागितलेली नाही, तेव्हा आमच्याकडूनही माफीची अपेक्षा करू नये असं म्हटलं आहे.
कुलविंदर कौर यांची बंगळुरूला बदली झाल्याबद्दल सीआयएसएफकडूनही प्रतिक्रिया आली होती. सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, कॉन्स्टेबल कुलविंदर कौर अजूनही निलंबित आहेत आणि त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू आहे. त्यांची बदली पतीसह बंगळुरू येथे झाली आहे, जे देखील सीआयएसएफमध्ये आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
६ जून रोजी सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी चंदीगड विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी, हिमाचल येथील भाजपा खासदार कंगना राणौतला कानशिलात लगावली होती. कंगना राणौतने या घटनेबाबत एक व्हिडिओ जारी करून तिला कानशिलात लगावल्याचं आणि शिवीगाळ केल्याचं सांगितलं, मी सुरक्षित आहे पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादामुळे मी चिंतेत आहे असं सांगितलं होतं.